
Iran Israel War : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. इराणने होर्मुझची खाडी बंद केल्यामुळे इतर आशियाई देशांना होणार कच्च्या तेलाचा पुरवठा खंडित झाला आहे. इराणे इतरही काही आखाती देशांवर हल्ले चढवल्यामुळे नैसर्गिक वायूच्या पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच गभरात इंधन तुटवडा निर्माण होण्याचं गहिरं संकट उभं ठाकलं आहे. सोबतच इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणमध्य शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता भारताने हे युद्ध थांबवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता अॅक्शन मोडमध्ये आले असून त्यांनी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रॉ यांच्याशी फोन कॉलद्वारे चर्चा केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी मॅक्रॉ यांच्याशी फोन कॉलद्वारे चर्चा केली आहे. या फोन कॉलमध्ये सध्या पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धावर गंभीर चर्चा करण्यात आली. पश्चिम आशियातील अशांतता याबाबत दोन्ही नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. यासह हा वाद संवाद आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून संपवला पाहिजे, असेही मत व्यक्त करण्यात आले. हे युद्ध सुरू झाल्यानंतर मोदी यांनी याआधी अनेक आखाती देशांशी चर्चा केलेली आहे.
हा संवाद होताच नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मॅक्रॉ यांच्यासोबत झालेल्या संवादाविषयी माहिती दिली आहे. “मी आज माझे मित्र इमॅन्यूएल मॅक्रॉ यांच्याशी फोन कॉलद्वारे संवाद साधला. पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीबद्दल आम्ही दोघांनीही चिंता व्यक्त केली. संवाद आणि मुत्सद्देगिरीवर परत यायला हवे, असेही मत व्यक्त केले. पश्चिम आशियात पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही दोघेही प्रयत्न करणार आहोत,,” असे मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.
Spoke with my friend President Emmanuel Macron today. We discussed our shared concerns over the evolving situation in West Asia and the need for a return to dialogue and diplomacy. We will continue to engage closely and coordinate efforts towards the early restoration of peace…
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2026
दरम्यान, दुसरीकडे हे युद्ध थांबावे यासाठी चीननेदेखील पुढाकार घेतला आहे. आम्ही आमचा दूत पश्चिम आशियात पाठवणार आहोत, असे चीनने जाहीर केले आहे. त्यानंतर भारतानेही पुन्हा एकदा शांतता आणि चर्चेकडे परतायला हवे, असे आवाहन केल्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.