Nepal Flood: आता युपी, बिहारचा नंबर, नेपाळचं संकट भारतावर सरकरणार, ISRO कडून धडकी भरवणारे Photo समोर
Nepal Flood Update: नेपाळमधील विनाशकारी पूर केवळ मुसळधार पाऊस किंवा हिमस्खलनामुळे आले नाहीत, तर पर्वतांवरील ढिगाऱ्यांनी नद्यांचा प्रवाह अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ISRO, NRSC उपग्रहांकडून धडकी भरवणारे फोटो समोर आले आहेत.

Nepal Flash Flood: नेपाळमधील विनाशकारी पूर केवळ मुसळधार पाऊस किंवा हिमस्खलनामुळे आले नाहीत, तर पर्वतांवरील ढिगाऱ्यांनी नद्यांचा प्रवाह अडवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ISRO, NRSC उपग्रहाच्या फोटोंमधून नेपाळच्या रसुवा प्रदेशात अशा दोन मोठ्या कृत्रिम तलावांची निर्मिती झाल्याचे उघड झाले आहे. ISRO/NRSC च्या उपग्रह विश्लेषणानुसार, लगतांग लिरुंग पर्वतरांगेतील एका मोठ्या बर्फाच्या हिमस्खलनामुळे मोठ्या प्रमाणात ढिगारा खाली आला. या ढिगाऱ्यांनी नदीचा प्रवाह अडवल्यामुळे रसुवा जिल्ह्यात दोन मोठे जलाशय तयार झाले.
उपग्रहांनी पाठवलेल्या फोटोंमधून या दोन जलाशयांचा आकार समोर आला आहे. एका तलावाचे क्षेत्रफळ अंदाजे १९ हेक्टर आहे, तर दुसऱ्याचे अंदाजे ११ हेक्टर आहे. यापैकी एका जलाशयाची लांबी अंदाजे ९४४ मीटर, म्हणजेच जवळपास एक किलोमीटर नोंदवली गेली आहे. या तलावांमुळे बिहार आणि उत्तर प्रदेशलाही धोका निर्माण झाला आहे. जर हे तलाव फुटले, तर कोसी आणि गंडक नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढेल, ज्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील या नद्यांच्या काठावरील गावे आणि शहरे कोलमडून पडतील.
इस्रोच्या राष्ट्रीय दूरसंवेदन केंद्राने पुराचे पाणी आणि ढिगाऱ्यांच्या व्याप्तीचे मूल्यांकन करण्यासाठी कार्टोसॅट-३ एमएक्स आणि रिसोर्ससॅट-२ए मधून मिळालेल्या फोटोंचे विश्लेषण केले. या फोटोंनी लाटांग भागापासून खालच्या भागापर्यंत पूर आणि ढिगाऱ्यांचा व्यापक परिणाम दर्शवला. विश्लेषणातून असे दिसून आले की हिमस्खलनातील ढिगारा नदीच्या मार्गात जमा झाला होता. नदीच्या नैसर्गिक प्रवाहात अडथळा निर्माण झाल्यामुळे पाणी साचले आणि नंतर, जेव्हा हे पाणी पुढे सरकले, तेव्हा खालच्या भागात अचानक आलेल्या पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली.
उपग्रह फोटो दर्शवतात की ढिगाऱ्यांचा लाटांग भागातील नद्यांवर परिणाम झाला आहे. पुराच्या जोरदार प्रवाहामुळे परिसरातील पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. अहवालानुसार, त्रिशुली धरण आणि एका नवीन पुलालाही पुराचा फटका बसला. या आपत्तीचा परिणाम रसुवा ते नुवाकोटपर्यंत जाणवला. हिमस्खलन, नदीत साचलेल्या ढिगाऱ्यांमुळे आणि त्यानंतर आलेल्या अचानक पुरामुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली.