Nepal Flood: अगोदर नकार, आता जोडले हात! दिल्ली धावली नेपाळच्या मदतीला
Nepal Flood foreign Help: बचाव आणि शोध कार्यात मोठे अडथळे येत आहेत. अनेक देशांच्या नागरिकांचा ठावठिकाणा समोर येत नसल्याने आता नेपाळने भारत आणि चीनच्या बचाव आणि शोध पथकाला पाचारण करण्याची विनंती केली आहे.

नेपाळमध्ये महापूराने अनेक जिल्ह्यात होत्याचे नव्हते झाले. गावांना आणि शहरांना मोठा फटका बसला. संपर्काची साधनं नेस्तनाबूत झाल्याने अनेक ठिकाणी मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहे. काल परवापर्यंत नेपाळने आंतरराष्ट्रीय शोध पथकांची देशात गरज नसल्याचे म्हटले होते. इतर देशांच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची मदत नसल्याचा दावा केला होता. पण आता नेपाळ सरकारने भूमिका बदलली आहे. अनेक देशांचे नागरिकांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. अनेक पर्यटक नेपाळमधील डोंगराळ भागात अडकले आहेत. त्यातच चीनने अजून हायअलर्ट दिला आहे. पुन्हा महापूर येण्याचा धोका आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाने नेपाळवर दबाव टाकला आहे. त्यानंतर भारत आणि चीनच्या बचाव पथकांना नेपाळमध्ये पाठवण्याची विनंती सरकारने केली आहे.
मदतीसाठी भारताची टीम नेपाळमध्ये
नेपाळ सरकारच्या विनंतीनंतर दिल्लीने तातडीने भारताची तंत्रज्ञान तज्ज्ञांची एक टीम काठमांडूला पाठवली. ही टीम तिथं पोहचली आहे. भारतीय हवाई दल सुद्धा पोहचले आहे. बचाव आणि शोध कार्यात भारतीय वायू दल मदत करत आहे. भारताने औषधं आणि खाद्यपदार्थांसह 10 टन गरजेच्या वस्तू नेपाळला पाठवल्या आहेत. पूरग्रस्त भागात भारतीय वायू दलाचे सी 130 विमान 10 टन अत्यावश्यक सामान घेऊन पोहचले आहे.
यापूर्वी नेपाळ सरकारने बुधवारी, 26 ऑगस्ट रोजी परदेशी बचाव पथक आणि शोध मोहिम तज्ज्ञांची गरज नसल्याचे म्हटले होते. नेपाळची राष्ट्रीय आपत्ती चमू त्यासाठी सक्षम असल्याचे बालेन शाह सरकारने स्पष्ट केले होते. पण आता नेपाळ सरकारने मत बदलले आहे. मृताचे डीएनए टेस्ट, फॉरेन्सिक तपास आणि बचाव कार्यात त्यांनी आता भारत आणि चीनच्या टीमला सहकार्यासाठी बोलावले आहे.
आंतरराष्ट्रीय बचाव पथकांना परवानगी
अनेक परदेशी नागरिकांचा अजून ठावठिकाणा समोर आलेला नाही. युरोपसह इतर देशातील अनेक नागरिक बेपत्ता आहेत. अनेक भारतीयांचा पत्ता नाही. यामुळे नेपाळ सरकारवर त्यांना शोधण्यासाठी दबाव वाढला होता. नेपाळकडील अपुरी संसाधने आणि साहित्य, तसेच अनेक ठिकाणी संपर्कासाठी अद्यायावत यंत्रणा नसल्याने मोठी अडचण येत होती. अखेर या अडचणी पाहता नेपाळ सरकारने आंतरराष्ट्रीय मदत पथकांना परवानगी दिली आहे.
नेपाळवर निसर्ग कोपला आहे. या आपत्तीत आतापर्यंत 626 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर जवळपास 2,500 लोक बेपत्ता आहेत. त्यात 320 भारतीयासह 100 भारतीय वंशांच्या कामगारांचा समावेश आहे. त्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. तर चीनने नवीन अलर्ट दिला आहे. त्यानुसार पुन्हा महापूराचा धोका वाढला आहे.