नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस झाला आहे. या भीषण संकटादरम्यान अमेरिका नेपाळच्या मदतीला धावली आहे. या दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी घोषणा केली आहे.

नेपाळमध्ये पुरामुळे भयंकर विध्वंस; भीषण संकटादरम्यान अमेरिका मदतीला, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा
nepal flood
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 7:26 AM

नेपाळ-तिबेट सीमेवर पुरामुळे भयंकर विध्वंस झाला आहे. या भीषण पूर परिस्थितीमुळे नेपाळमधील काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पुरामुळे आतापर्यंत 392 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1500 हून अधिक जण बेपत्ता झाले आहेत. पुरामुळे अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. बचाव पथकाकडून सातत्याने मदतकार्य सुरू आहे. बेपत्ता लोकांमध्ये परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या भीषण संकटादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेपाळसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे नेपाळच्या मदतीला पुढे सरसावले आहेत. नेपाळमधील पूर अतिशय भयंकर असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. वॉशिंग्टनहून नेपाळमधील नेत्यांच्या संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, ‘नेपाळमधील पूर अतिशय भयंकर असून आम्ही नेपाळमधील नेत्यांना फोन केला होता. आम्ही त्यांना मदतीविषयी विचारणा केली. नेपाळसोबत आमचे संबंध चांगले आहेत. पुरामुळे सर्वत्र नेपाळमध्ये चिखल आणि पाणी झालं आहे. खरंतर या दोन्ही मिश्रणाचा पूर आलाय, असे दृश्य दिसत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. असे दृश्य याआधी कधीही पाहिले नव्हते’.

नेपाळमध्ये बाहेरून मजबूत दिसणाऱ्या इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. ही सर्वात भयंकर घटना आहे. आमचं नेपाळमधील नेत्यांशी बोलणे सुरू आहे. नेपाळ जी मदत मागेल, ती मदत करू, असेही ट्रम्प यांनी आश्वासित केले. नेपाळमधील पुरानंतर भारत देश देखील मदतीला धावला आहे. भारतानेही नेपाळसाठी मदतकार्याचा वेग वाढवला आहे. भारताने गुरुवारी सकाळी दिल्लीच्या हिंडन विमानतळावरून सी-17 लष्करी वाहतूक विमानाद्वारे नेपाळला 35-37 टन मदतीचं साहित्य पाठवलं. भारताने मानवतावादी दृष्टीकोनातून नेपाळला ही मदत पाठवल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळने या मदतीबद्दल भारताचे आभार देखील मानले आहेत.

तत्पूर्वी, भारत, अमेरिकेव्यतिरिक्त ब्रिटेन, वर्ल्ड बँकेनेही आधीच मदतीची घोषणा केली आहे. आशियन डेव्हलेपमेंट बँकचे अध्यक्ष मासातो कांडा यांनी नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांच्या चर्चा करून पुराची पूर्वसूचना प्रणाली आणखी मजबूत करण्यासाठी मदतीचे आश्वासन दिलं. त्याचबरोबर नेपाळी दूतावासांना कोणतीही आर्थिक मदत ही फक्त पंतप्रधानांच्या मदत निधीमार्फतच स्वीकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us