Nepal PM Resigns : नेपाळच्या पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा, हिंसाचारानंतर निर्णय

नेपाळमध्ये मोठे अराजक माजले आहे. येथे सोशल मीडिया बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर तरुण चांगलेच संतापले आहेत. दरम्यान आंदोलकांनी जाळपोळ केल्याने तसेच या आंदोलनात अनेकांचा मृत्यू झाल्याने नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे.

Nepal PM Resigns : नेपाळच्या पंतप्रधानांचा तडकाफडकी राजीनामा, हिंसाचारानंतर निर्णय
k p sharma oli resigns
| Updated on: Sep 09, 2025 | 2:48 PM

Nepal Prime Minister K pP sharma Oli Resigns : भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये मोठे अराजक माजले आहे. वाढता भ्रष्टाचार आणि सोशल मीडियावर बंदी घातल्यामुळे तेथील जनता चांगलीच आक्रमक झाली असून अनेक ठिकाणी जाळपोळ केली जात आहे. नेपाळची राजधानी काठमांडू येथे तर प्रत्येक रस्त्यावर आंदोलक दिसत असून अनेक ठिकाणी आग लावली जात आहे. सध्या नेपाळमधील याच अराजकाची नैतिक जबाबदारी घेऊन 8 सप्टेंबर रोजी तेथील गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. आता नेपाळमधूनच मोठी माहिती समोर येत आहे. नेपाळमधील जनतेने तेथील सत्ता उलथवून लावली असून आता तेथील पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. केपी ओली यांच्या राजीनाम्यामुळे आता काठमांडूमध्ये जल्लोष केला जातोय.

अगोदर गृहमंत्री, आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा

मिळालेल्या माहितीनुसार नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याआधी नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी जेनझींच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराची नैतिक जबाबदारी घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला होती. केपी शर्मा ओली यांनी राजीनामा देण्याआधी नेपाळच्या आरोग्यमंत्र्यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. देशाच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्यांनी आपल्या पदापासून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केपी शर्मा ओली यांनीही पंतप्रधानपदापासून दूर होण्याचा निर्णय घेत राजीनामा दिला आहे.

नवे पंतप्रधान कोण, संध्याकाळपर्यंत निर्णय

केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता या देशाचे नेतृत्त्व कोणाकडे जाणार, याबद्दल चर्चा चालू झाली आहे. सध्यातरी या पदासाठी नव्या नेत्याचे नाव समोर आलेले नाही. मात्र मिळालेल्या माहितीनुसार 9 सप्टेंबरच्या संध्याकाळपर्यंत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल. सध्या काठमांडू तसेच नेपाळमधील अन्य शहरांतील परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागोजागी लष्कराचे जवान, पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

नेपाळमध्ये अराजक का माजले?

नेपाळ सरकारने फेसबूक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यासारख्या समाजमाध्यमांवर बंदी घातली होती. यामुळे तरुणांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला. वाढती महागाई, बोकाळलेला भ्रष्टाचार यामुळे अगोदरच जनतेत रोष होता. त्यानंतर सरकारने सोशल मीडियावर बंदी घातल्यानंतर तरुणांचा हा राग जास्तच वाढला. परिणामी हजारो तरुणांनी काठमांडूमध्ये एकत्र येत संसदेच्या दिशेने कुच केले. निदर्शन करत संसदेत घुसले आणि जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यावर एकूण 20 पेक्षा अधिक आंदोलकांचा मृत्यू झाला तर 250 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले. नंतर चिडलेल्या जनतेने मंत्र्यांच्या निवासस्थानालाही आग लावली. यामुळे नेपाळमधील अस्थिरता जास्तच वाढली. परिणामी आता केपी शर्मा ओली यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. केपी शर्मा यांच्या राजीनाम्यानंतर आता नेपाळमधील जनतेने जल्लोष केला आहे. लवकरच नव्या पंतप्रधानांची निवड केली जाणार आहे.