
अमेरिकेने H-1B व्हिसाच्या नियमात मोठा बदल केला. ज्याचा थेट फटका अनेक भारतीयांना बसला. अमेरिकेत जास्त करून भारतीय लोक H-1B व्हिसावर जातात. मात्र, आता या व्हिसावर जाणे कठीण झालंय. फक्त नियमच कडक करण्यात आली असे नाही तर शुल्क तब्बल 88 लाख रूपये लावण्यात आले आहे. आता अमेरिकेच्या पाठोपाठ युएईने 2026 साठी अनेक नियम जाहीर केले आहेत. नवीन वर्षापासून यूएईमध्ये मोठे बदल होतील. फ्लाइंग टॅक्सी सेवा सुरू होतील. हेच नाही तर 1 जानेवारी 2o26 पासून देशात साखरयुक्त पेयांवर कर आकारण्याच्या पद्धतीत मोठे बदल होणार असल्याचेही युएईने म्हटले. अर्थ मंत्रालय आणि संघीय कर प्राधिकरणाने याबद्दल थेट भाष्य देखील केले आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गोड पेयांवर कर त्यांच्या उत्पादन श्रेणीपेक्षा त्यांच्या साखरेच्या प्रमाणावर आधारित असेल.
याचा मुख्य उद्धेश फक्त कर लावणे नाही तर देशाला निरोगी बनवणे हा देखील आहे. 2026 पासून युएईने अनेक गोष्टींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा उद्देश करदात्यांचे जीवन सोपे करणे आणि अधिक पारदर्शकता वाढवणे आहे. 2026 नंतर युएईमध्ये ई-इनव्हॉइसिंग प्रणाली लागू होईल. नवीन प्रणालीनुसार व्यवसायांना प्रमाणित इलेक्ट्रॉनिक स्वरूपात बीजकांची देवाणघेवाण करावी लागेल.
बहुप्रतिक्षित देशभरातील एतिहाद रेल 2026 मध्ये प्रवाशांसाठी सुरू होईल. हे नेटवर्क महत्वाच्या आठ शहरांना जोडेल. विशेष म्हणजे यामुळे प्रवास सोप्पा आणि कमी वेळेत होईल. यामुळे लोक देशातील कानाकोपऱ्यापर्यंत प्रवास करू शकणार आहेत. रेल्वेमुळे अर्थव्यवस्थेला एक नवी चालना मिळेल आणि देशाच्या रिअल इस्टेट क्षेत्रात परिवर्तन होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
आता युएईच्या शुगर कराची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. अमेरिका जवळपास सर्वच वस्तूंवर कर लावत असताना युएईने देखील मोठा निर्णय घेतला. मात्र, त्यांनी हा निर्णय लोकांच्या हितासाठी घेतला. युएईने लावलेल्या कराची तूफान चर्चा आहे. ज्या शितपेयांमध्ये जास्त शुगर त्यावर सर्वाधिक कर असणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.