
News9 Global Summit : टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांनी बुधवारी ९ ऑक्टोबर २०२५ रोजी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे आयोजित केलेल्या न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. “नवीन भारतामध्ये होत असलेल्या बदलांविषयी आणि प्रगतीविषयी परदेशी नागरिकांमध्ये फार मोठी उत्सुकता आहे”, असे बरुण दास यांनी म्हटले.
टीव्ही 9 नेटवर्कच्या वतीने यावर्षी ही ग्लोबल समिट जर्मनीतील स्टुटगार्ट शहरात आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलताना बरुण दास यांनी नव्या भारताबद्दल गेल्या काही वर्षातील अनुभव सांगितले. “अनेक परदेशी नागरिकांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आले की ते भारताच्या आधुनिकीकरणाबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत”, असे बरुण दास यांनी म्हटले.
यावेळ बरुण दास यांनी फ्रँकफर्टच्या एका विमानातील संवादाचा अनुभव सांगितला. “मी एका जर्मन नागरिकाच्या शेजारी बसलो होतो. त्यांनी मला सांगितले की ते नवीन भारतावर अभ्यास करत आहेत. यावेळी त्या व्यक्तीने मला थेट प्रश्न विचारला. तुमच्या मते, नवीन भारतामध्ये सर्वात मोठा बदल काय आहे?” असा प्रश्न मला त्याने विचारला. या प्रश्नावर उत्तर देताना दास म्हणाले, “हा प्रश्न ऐकायला साधा वाटू शकतो, पण त्याचा अर्थ खोलवर दडलेला होता. त्याने मला एका क्षणासाठी विचार करायला लावले.”
या प्रश्नाचे उत्तर देताना बरुण दास यांनी भारताच्या प्रगतीबद्दल सांगितले. “भारतामध्ये आधुनिकता झपाट्याने स्वीकारण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर तो आपली भारतीयताही जपून ठेवतो. भारतीयता म्हणजे केवळ संस्कृती नव्हे, तर समावेशकता आणि सर्वांना सोबत घेऊन चालणे याचाही समावेश होतो. आज जगाला हे उमजू लागले आहे की शांतता आणि समृद्धीचा एकमात्र मार्ग सर्वांना एकत्र घेऊन जाण्यातच आहे.”
यापुढे ते म्हणाले, “भारताने आधुनिकतेची जी मोठी झेप घेतली आहे. ती वायरलेस आणि डिजिटल तंत्रज्ञान स्वीकारल्याच्या उदाहरणावरून उत्तम प्रकारे समजू शकते. यावेळी त्यांनी युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) चा उल्लेख केला. ते म्हणाले, “केवळ ऑगस्ट महिन्यात UPI च्या माध्यमातून २० अब्जाहून अधिक आर्थिक व्यवहार झाले आहेत. आज भारतातील सर्वात गरीब नागरिकही स्मार्टफोन वापरतो आणि त्याच्या दैनंदिन जीवनातील आवश्यक माहिती व सेवा मिळवतो. सरकारी अनुदानाचे कोट्यावधी रुपये कोणत्याही कपातीशिवाय थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात. यामुळे भारतामध्ये स्मार्टफोन हे केवळ संपर्काचे साधन न राहता आर्थिक समृद्धीचे एक शक्तिशाली साधन बनले आहे”, असेही बरुण दास यांनी स्पष्ट केले.