
Iceland: इराणविरोधातील तणाव जस जसा वाढत आहे, तशा तेलाच्या किंमती वाढत आहेत. इंधन आयातीवर अवलंबून असलेल्या भारतासारखे देश या युद्धाने होरपळले जात आहेत. दिवसागणिक गॅस दरवाढ, इंधन दरवाढीची भीती आणि तुटवडा सतावत आहे. देशात एलपीजी सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर अजूनही हे संकट कोणते रुप घेईल हे सांगता येत नाही. त्याचे चटके मात्र सर्वसामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहे. पण हा देश या ऊर्जा संकटापासून कोसो दूर आहे. या देशातील अखेरचा पेट्रोल पंप पण अखेरच्या घटका मोजत आहे. या देशाला ऊर्जेसाठी नवीन स्त्रोत उपलब्ध झाल्याने आता खनिज तेलावर हा देश अवलंबून नाही. या छोट्या देशाचे नाव आयसलँड असे आहे. हा जगातील एकमेव ऊर्जा स्वतंत्र देश मानल्या जातो.
या देशाला निसर्गाचे वरदान
आयसलँड या देशाला निसर्गाचे वरदान आहे. हा देश आपल्या ऊर्जेच्या गरजेपैकी जवळपास 85% ते 90% गरज विना जीवाश्म इंधन स्त्रोतातून पूर्ण करतो. म्हणजे या देशाला कच्चा तेलाची गरज नाही. इथे मुबलक भूऔष्णिक आणि जलविद्युत संसाधने आहेत. येथील ऊर्जा मॉडेल जगासाठी एक मोठे उदाहरण आहे.
जियोथर्मल ऊर्जा
आईसलँडच्या ऊर्जा स्वातंत्र्यात भूऔष्णिक ऊर्जेचा सर्वात मोठा वाटा आहे. या देशात मोठ्या संख्येने ज्वालामुखी आहे. त्याचा वापर देशात वीज तयार करण्यासाठी आणि घरातील वातावरण उष्ण ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. आयसलँडची जवळपास 65% ऊर्जा भूऔष्णिक स्त्रोताद्वारे पूर्ण होते. याचा अर्थ घरांना उष्ण ठेवण्यासाठी, पाणी पुरवठा ठेवण्यासाठी आणि उद्योगांना चालवण्यासाठी ही ऊर्जा फायदेशीर ठरते. त्यामुळे या देशाला कच्चा इंधनावर अवलंबून राहण्याची गरज नाही.
हायड्रोपॉवरच्या मदतीने ऊर्जेची गरज पूर्ण
आयसलँड उर्वरीत ऊर्जा म्हणजे 20% ते 25% ऊर्जा हायड्रोपॉवरद्वारे तयार करतो. तर हिमनद्यांमधून उगम पावणाऱ्या नद्या आणि धबधबे यांच्या माध्यमातून वीज तयार करण्यात येते. हा येथील अक्षय ऊर्जेचा एक मोठा पर्याय आहे. या देशात वीज अत्यंत स्वस्त आहे. वीज निर्मितीचा खर्च कमी असल्याने हे शक्य झाले आहे. त्यामुळे या देशात ऊर्जेसाठी इतर स्त्रोतावर अवलंबून राहण्याची गरज नाही. केवळ हाच देश नाही तर नॉर्वे, स्वीडन, पॅराग्वे आणि कोस्टारिका या सारखे देश सुद्धा अक्षय ऊर्जेवर अवलंबून आहेत. ते नैसर्गिक स्त्रोतापासून ऊर्जा तयार करत आहेत. त्यामुळे येथे प्रदूषणाचा टक्का पण घसरला आहे.