
भारत पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण स्थिती निवळून तीन महिन्यांचा अवधी झाला आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं या परिस्थितीबाबत तुणतुणं सुरुच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या दाव्यावरही आजही कायम आहेत. त्यांच्या मध्यस्थीमुळेच भारत पाकिस्तान संभाव्य युद्ध शमलं असा दावा आहे. इतकंच काय तर ही लढाई अणुयुद्धात बदलू शकली असती असा दावा देखील त्यांनी केला आहे. दुसरीकडे, ट्रम्प यांचा दावा भारताने वारंवार खोडून काढला आहे. भारताने स्पष्ट केलं की, दोन्ही देशातील लष्करी प्रमुखांमधील थेट संवादातून संभाव्य तणावपूर्ण स्थिती निवळली. पण पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प बरळले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा युद्धबंदीचा सूर आळवला. माझ्या हस्तक्षेपामुळेच हे संभाव्य युद्ध संपुष्टात आलं, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती होती. दोन्ही देश एकमेकांची लढाऊ विमानं पाडत होते. सहा-सात विमानं पाडली. परिस्थिती इतकी तणावपूर्ण झाली होती की, कदाचित अण्वस्त्रे वापरण्याची तयारी झाली होती. पण आम्ही ते प्रकरण सोडवलं. दरम्यान, गेल्या सहा महिन्यात सहा युद्धात यशस्वी मध्यस्थी करून सोडवली, असा दावा करत आम्हाला त्याचा अभिमान आहे असेही सांगितलं.
डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांना भेटण्यापूर्वी हा दावा केला आहे. त्यामुळे ट्रम्प भारताला कोंडीत पकडण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. भारत आणि रशिया यांच्यात होत असलेला तेल व्यापार ट्रम्प यांना रुचलेला नाही. अमेरिकेने भारतावर 50 टक्के कर लादला आहे. यामुळे भारताच्या अमेरिकेतील निर्यातीवर परिणाम होणार आहे. दुसरीकडे, ‘मी राष्ट्रपती नसतो तर पुतिन यांनी संपूर्ण युक्रेन ताब्यात घेतले असते.’ , असंही ते म्हणाले. ट्रम्प पुतिन यांची भेट अलास्का येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचं हे विधान देखील तितकंच महत्त्वाचं आहे. भारतीय वेळेनुसार 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता ही भेट होईल. या भेटीत काय होतं यावर आता भारताचं पुढचं धोरण ठरणार आहे.