
अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये उफाळून आलेला संघर्ष आता शांत झाला आहे, याबाबत अफगाणिस्तानमधील तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी रविवारी घोषणा केली. दरम्यान त्यापूर्वी तालिबानकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शनिवारी पाकिस्तासोबत झालेल्या चकमकीमध्ये पाकिस्तानचे 58 सैनिक मारले गेले आहेत, तर दुसरीकडे या घटनेत अफगाणिस्तानच्या देखील 9 सैनिकांचा मृत्यू झाला असून, 16 जण जखमी झाले आहेत, असं तालिबानने म्हटलं आहे. अफगाणिस्तानी मिडिया टोलो न्यूजने दिलेल्या माहितीनुसार आधी पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या काबुलवर एअरस्ट्राईक केला, या एअरस्ट्राईकला अफगाणिस्तानने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे हा संघर्ष उफाळून आला, युद्धाला सुरुवात झाली. पाकिस्तानने केलेल्या एअरस्ट्राईकनंतर दोन्ही बाजूंनी कित्येक तास फायरिंग सुरूच होती.
दरम्यान आता अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेलं युद्ध थांबलं आहे, याबाबत तालिबानचा प्रवस्ता जबीहुल्लाह मुजाहिद यांनी माहिती दिली, याबाबत माहिती देताना मुजाहिद यांनी म्हटलं की, आम्ही कतार आणि सौदी अरेबियाच्या मध्यस्थीमुळे हा संघर्ष थांबवण्याचा निर्णय घेतला, आम्ही सीमेवर सुरू असलेला संघर्ष आता थांबवला आहे. आम्हाला आमच्या प्रदेशात शांती हवी आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये उफाळून आलेल्या या संघर्षावर इराण, सौदी अरेबिया आणि कतार या देशांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं आहे की, आम्ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे चिंतेत आहोत. दोन्ही देशांनी संयम ठेवला पाहिजे, संवादाच्या माध्यमातून कोणत्याही समस्येवर तोडगा निघू शकतो. तर कतारच्या परराष्ट्रमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, दोन्ही देशांमध्ये शांतता टिकावी यासाठी आम्ही शक्य तेवढे प्रयत्न करू, इराणने देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने संयम ठेवावा, पाकिस्तान आणि अफागाणिस्तानमध्ये स्थिरता याचाच अर्थ त्या संपूर्ण प्रदेशात स्थिरता असा होतो असं इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत, यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे, आम्हाला पाकिस्तानसोबत चांगले संबंध हवे आहेत, मात्र काही लोक आहेत, त्यांना हे संबंध बिघडवायचे आहेत, आम्हाला सीमेवर कोणत्याच प्रकारचा तणाव नको आहे, मात्र आमच्यावर जर हल्ला झाला तर संरक्षण कसं करायचं हे आम्हाला माहीत आहे, त्याचे परिणाम वाईट होतील, असा इशाराही त्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला आहे.