
एप्रिलमध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते. यात भारतीय सैन्याने पाकिस्तानातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करून अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या धक्यातून पाकिस्तान अजूनही सावरलेला नाही. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तान भयभीत झाला होता. अशातच आता पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूल केले आहे की, भारताने 10 मे रोजी सकाळी नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता. तसेच त्यांनी भारताने पाकिस्तानवर 36 तासांत 80 ड्रोन हल्ले केल अशी कबुलीही दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी म्हटले की, ‘मे महिन्यातील भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात आम्ही पाकिस्तान आणि भारत यांच्यात मध्यस्थीची विनंती केली नव्हती. मात्र त्यावेळी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताची बोलण्यासाठी तयार आहोत अशी माहिती दिली आहे. या हल्ल्यात ऑपरेशनमध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांना उद्धवस्त केले होते.’
मे महिन्यात भारताने राबवलेले हे ऑपरेशन चार दिवस सुरू होते. त्यानंतर 10 मे रोजी दोन्ही देशांमध्ये लष्करी कारवाई थांबवण्याच्या करारावर झाला होता. 2025 मध्ये पाकिस्तानच्या राजनैतिक कारवायांचे वर्णन करताना दार म्हणाले की, ‘भारताने पाठवलेले 80 पैकी 79 ड्रोन रोखण्यात आले. त्यानंतर 10 मे रोजी सकाळी भारताने नूर खान एअरबेसवर हल्ला केला, त्यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर दिले.”
पुढे बोलताना दार म्हणाले की, 10 मे रोजी सकाळी 8:17 वाजता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी त्यांना फोन करून भारत युद्धबंदीसाठी तयार असल्याची माहिती दिली. मी म्हटले होते की आम्हाला युद्ध नको आहे. सौदीचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल यांनी नंतर संपर्क साधला आणि भारताशी बोलण्याची तयारी दर्शवली. यानंतर युद्धबंदीवर सहमती झाल्याची माहिती दिली. दार यांनी 7 मे रोजी झालेल्या लढाईत पाकिस्तानने 7 भारतीय विमाने पाडल्याचा दावा केला, मात्र याचा कोणताही पुरावा त्यांनी दिला नाही.