Pakistan Election 2024 | पाकिस्तानात बहुमत नक्की कोणाकडे? तुरुंगातून इम्रान खान यांचा मोठा दावा

Pakistan Election 2024 | पाकिस्तानात प्रांतीय आणि नॅशनल असेंबलीची निवडणूक पार पडली. माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात असूनही त्यांच्या पक्षाच समर्थन असलेल्या उमेदवारांना जनतेने भरभरुन मतदान केलं. पाकिस्तानात नॅशनल असेंबली निवडणूक निकालात नेहमीच जय-पराजयाबद्दल संशय असतो. आत्ताही तीच स्थिती आहे.

Pakistan Election 2024 | पाकिस्तानात बहुमत नक्की कोणाकडे? तुरुंगातून इम्रान खान यांचा मोठा दावा
Imran Khan
| Updated on: Feb 10, 2024 | 7:48 AM

Pakistan Election 2024 | पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणूक झाली. यात कुठल्याही एकापक्षाला बहुमत मिळालेलं नाही. मतमोजणी अजूनही सुरु आहे. या दरम्यान जेलमध्ये बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय प्रमुख इम्रान खान यांनी तुरुंगातून मोठा दावा केला आहे. “पीटीआयच समर्थन असलेले उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले आहेत. आमच्याकडे दोन-तृतीयांश बहुमत आहे” असा दावा इम्रान यांनी केला आहे. “फॉर्म 45 डेटानुसार पीटीआयच समर्थन असलेले उमेदवार 170 पेक्षा अधिक जागांवर जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहेत” असं इम्रान यांनी म्हटलं आहे.

या दरम्यान त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजचे (PML-N) प्रमुख आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर निशाणा साधला. “30 जागांवर पिछाडीवर असूनही त्यांनी विजयी भाषण केलं. कुठलाही पाकिस्तानी हे स्वीकार करणार नाही. आंतरराष्ट्रीय मीडिया सुद्धा नवाज यांच्या मूर्खपणाबद्दल लिहित आहे” अशी टीका इम्रान खान यांनी केली. त्यांनी पाकिस्तानी जनतेचे आभार मानले.

लंडन प्लान फेल

“मी तुम्हा सर्वांना इलेक्शन 2024 जिंकल्याबद्दल शुभेच्छा देतो. तुम्ही मतदानासाठी बाहेर पडणार, हा मला तुमच्या सर्वांवर विश्वास होता. तुम्ही माझ्या विश्वासाचा मान ठेवलात. तुम्ही मोठ्या संख्येने केलेल्या मतदानामुळे सगळेच हैराण झालेत. तुमच्या मतदानामुळे लंडन प्लान फेल झालाय” अस इम्रान खान AI-जनरेटेड स्पीचमध्ये म्हणाले.

कुठलाही पाकिस्तानी हे स्वीकार करणार नाही

“नवाज शरीफ एक नीच माणूस आहे. ऑफिशियल डेटानुसार 30 सीट मागे असतानाही त्याने विजयी भाषण दिलं. कुठलाही पाकिस्तानी हे स्वीकार करणार नाही. आंतरराष्ट्रीय मीडिया सुद्धा यावर लिहितोय. गोंधळ सुरु होण्याआधी आम्ही 150 जागांवर जिंकत होतो. आता 170 पेक्षा अधिक नॅशनल असेंबलीच्या जागांवर जिंकण्याच्या स्थितीमध्ये आहोत. तुम्हा सर्वांचा मला अभिमान आहे” असं इम्रान खानी यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तानात कसं बनणार सरकार?

नवाज शरीफ यांनी त्यांचा PML-N सर्वात मोठा पक्ष ठरल्याचा दावा केला आहे. लाहोरमध्ये त्यांनी विजयी भाषण केलं. आम्ही सर्व पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या जनादेशाचा सन्मान करतो. ‘देशाला संकटातून बाहेर काढण्याची PML-N ची जबाबदारी आहे; असं ते म्हणाले. देशात नवीन सरकार स्थापन करण्याची नवाज शरीफ यांनी घोषणा केली. ‘आम्ही स्वबळावर सरकार स्थापन करु शकत नाही’ असा दावा सुद्धा शरीफ यांनी केला. कुठल्याही एकापक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाहीय. त्यामुळे आघाडी सरकार स्थापन करणार असल्याच नवाज म्हणाले.