
Pakistan Vs India : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अजूनही पूर्ववत झालेले नाहीत. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर या दोन्ही देशांत युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान अशा दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात कठोर निर्णय घेतले होते. दोन्ही देशांनी एकमेकांचे विमान आपल्या हद्दीत येण्यावर निर्बंध घातलेले आहेत. सोबतच दोन्ही देशांनी एकमेकांसोबतचा व्यापारही थांबवलेला आहे. असे असतानाच आता पाकिस्तानने पुन्हा एकदा मोठा भारताविरोधात निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर आता भारताचे नुकसान होण्याऐवजी पाकिस्तानचेच जास्त नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे. पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी असलेली एअरस्पेस बंदी 24 जानेवारी 2026 पर्यंत वाढवलेली आहे.
पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या देशातून जाण्यास अससेली बंदी 24 जानेवारी 2026 पर्यंत वाढवली आहे. या निर्णयानंतर आता भारतात नोंदणी असलेले कोणतेही प्रवासी वाहतूक करणारे, खासगी विमान, तसेच भारतीय हवाई दलाचे विमान पाकिस्तानच्या हद्दीत जाण्यास मनाई असेल. पाकिस्तान एअरपोर्ट अथॉरिटीने (पीएए) तसा नोटम (वैमानिकांसाठी नोटीस) जारी केला आहे.
पाकिस्तानी एअरपोर्ट अथॉरिटीने जारी केलेला नोटम 16 डिसेंबर 2025 ते 24 जानेवारी 2026 पर्यंत लागू असेल. या नोटमनुसार भारतीय तसेच भारताने भाड्याने घेतलेली विमाने पाकिस्तानी हवाई हद्दीतून प्रवास करू शकणार नाहीत. पीएएनुसार हे निर्बंध गेल्या आठ महिन्यांपासून लागू आहेत. एप्रिल महिन्यात जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानने आपापले हवाई क्षेत्र एकमेकांसाठी बंद केले होते.
दरम्यान, पाकिस्तानने भारतीय विमानांना आपल्या हवाई हद्दीतून जाण्यावर निर्बंध घातले असले तरी या निर्णयामुळे पाकिस्तानचेच जास्त नुकसान होणार आहे. भारताची विमाने पाकिस्तानच्या हद्दीतून जात होती, तेव्हा त्यातून पाकिस्तानला मोठा महसूल मिळायचा. हा महसूल आता बंद झालेला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीतून जाण्यास मनाई आहे. त्यामुळे पाकिस्तानला काही देशांत जाण्यासाठी अन्य मार्गांनी जावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तानात विमान प्रवासही महागला आहे. पाकिस्तानच्या या निर्णयानंतर आता भारत नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.