
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानातील अनेक लष्करी तळ उडवले होते. यात शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. भारताच्या या हल्यात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. भारताने धडा शिकवल्यानंतरही पाकिस्तान सुधारण्याचे नाव घेत नाही. पाकिस्तानने आता उघडपणे पुन्हा दहशतवादाला पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचे मुख्यालय उद्ध्वस्त झाले होते. अशातच आता पाकिस्तान हे मुख्यालय पुन्हा बांधण्याची तयारी करत असल्याची माहिती गुप्तचर संस्थांनी दिली आहे. पाकिस्तान सरकार आणि लष्कराने या दहशतवादी संघटनेला मुख्यालय बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे. आता मुरीदके येथील मरकज तैयबाची बांधणी जलद गतीने सुरू झाली आहे. हे मुख्यालय पुन्हा एकदा तयार होत असल्याने भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण आगामी काळात याच मुख्यालयातून भारतावर हल्ल्याची योजना आखली जाण्याची शक्यता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पंजाब प्रांतातील मुरीदके येथील लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयावर हवाई हल्ला केला होता. या हल्ल्यात मरकज तैयबाचा सुमारे 70% भाग उद्ध्वस्त झाला होता. शस्त्रास्त्रांचे गोदाम, प्रशिक्षण केंद्र यासारखे मुख्यालयाचे महत्त्वाचे भाग उद्ध्वस्त झाले होते. तसेच या हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला होता. भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सुधारेल अशी अपेक्षा होती, मात्र पाकिस्तानने आता दहशतवादाला उघड पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे.
गुप्तचर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सरकारने लष्कर-ए-तैयबाला 4 कोटी पाकिस्तानी रुपये (1.25 कोटी भारतीय रुपये) निधी दिला आहे. हा निधी पूर मदत निधीतून देण्यात आला आहे. आता लष्कर-ए-तोयबा कमांडर मौलाना अबू झर आणि युनूस शाह बुखारी हे या मुख्यालयाच्या बांधकामावर नजर ठेवून आहेत. फेब्रुवारी 2026 पर्यंत हे बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात भारताची चिंता वाढण्याची शक्यता आहे.