
भारताला नेहमीच पाकिस्तानी दहशतवाद्यांपासून धोका राहिलेला आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला करून 26 भारतीय नागरिकांचा जीव घेतला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानात घुसून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. मात्र अजूनही भारताचा धोका टळलेला नाही. पाकिस्तान अजूनही भारताविरुद्ध सक्रिय असलेल्या दहशतवादी गटांचे आश्रयस्थान आहे, असा खुलासा अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिस (CRS) च्या ताज्या अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला अशा कारवाया हाणून पाडण्यासाठी तयार रहावे लागणार आहे. या अहवालाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अमेरिकेच्या काँग्रेस रिसर्च सर्व्हिसच्या अहवालातून अशी माहिती समोर आली आहे की, पाकिस्तानमध्ये अनेक प्रमुख दहशतवादी संघटना सक्रिय असून त्यांचे मुख्य टार्गेट जम्मू-काश्मीर आणि भारत हे आहे. काही दहशतवादी गट जम्मू काश्मीरमध्ये बेधडकपणे कारावाया करत असल्याचेही समोर आले आहे. CRS च्या इन फोकस या अहवालात 15 दहशतवादी संघटनांची माहिती देण्यात आली आहे. यांपैकी अनेक संघटनांना अमेरिकेने विदेशी दहशतवादी संघटना (FTO) म्हणून घोषित केले आहे. यात खालील संघटनांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या या अहवालात असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, पाकिस्तान या दहशतवादी गटांचा पूर्णपणे नायनाट करण्यात अपयशी ठरला आहे. हवाई हल्ले आणि लाखो गुप्तचर कारवाया आणि मोठ्या लष्करी मोहिमा असूनही, अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी घोषित केलेल्या या दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्यात अपयश आले आहे. 2014 च्या नॅशनल अॅक्शन प्लॅनचा उद्देश या गटांचा नाश करणे हा होता, परंतु या संघटना अजूनही सक्रिय आहेत. पाकिस्तानने 2023 मध्ये दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी काही पावले उचलली होती, मात्र तेथील मदरशांमध्ये अजूनही अशा विचारसरणीचे शिक्षण दिले जाते जे हिंसक अतिरेकी विचारधारेस प्रोत्साहन देऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानी सरकारची चिंता वाढलेली आहे.