Pakistan War Tension : इसे कहते हैं डर, पाकिस्तानमध्ये भिती इतकी की, तिथे शहरा-शहरात अशी सुरु आहे युद्धाची तयारी
Pakistan War Tension : पाकिस्तान सध्या प्रचंड तणावाखाली आहे. कुठून, कधी, कसा हल्ला होईल? ही भिती त्यांच्या मनामध्ये आहे. याच दहशतीमुळे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरात सध्या अशा पद्धतीने युद्धाची तयारी सुरु आहे. तिथल्या सरकारने काय आदेश दिलेत? ते जाणून घ्या.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. भारताकडून कधीही हल्ला होईल, ही भिती त्यांना सतावत आहे. ते किती दहशतीखाली आहेत, याचा अंदाज यावरुनच येतो की, त्यांनी त्यांची अणवस्त्र आणि फायटर जेट्स लपवून ठेवली आहेत. भारताकडून सर्वप्रथम अणवस्त्र आणि फायटर जेट्सना लक्ष्य केलं जाईल असं त्यांना वाटतं. त्याचवेळी जिन्नाने निर्माण केलेला हा देश युद्धाची तयारी करण्यामध्ये गुंतला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शहरांमध्ये सायरन लावले आहेत. जेणेकरुन, कुठल्याही संभाव्य हल्ल्याआधी जनतेला सर्तक करता येईल.
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा सरकारने पेशावर, अबोटाबाद, मर्दानसह प्रांताच्या 29 शहरात इशारा देणारे सायरन लावण्याचा निर्णय घेतला आहे या सायरनचा उद्देश इमर्जन्सीच्या स्थितीत नागरिकांना सर्तक करणं, त्यांना वॉर्निंग देणं हा आहे. शत्रूच्या हवाई हल्ल्यादरम्यान किंवा कुठल्याही विनाशकारी स्थितीत युद्धाचा इशारा देणारी सायरन प्रणाली महत्त्वाची भूमिका बजावते असं खैबर पख्तूनख्वा सरकारने म्हटलं आहे. “सायरनचा आवाज 10 ते 15 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला पाहिजे. 10 एचपीचे हे सायरन हूटर इन्स्टॉल करायला सांगितले आहेत” असे खैबर पख्तूनख्वा सरकारने आदेश दिले आहेत.
पाकिस्तानने अमेरिकेसमोर हात पसरले
पाकिस्तानने काल सांगितलं की, त्यांच्याकडे खात्रीलायक माहिती आहे की, भारत लवकरच त्यांच्या विरुद्ध सैन्य कारवाई सुरु करेल. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकेसमोर हात पसरले आहेत. “वक्तव्य कमी करुन जबाबदारीने काम करण्यासाठी भारतावर दबाव टाकावा” अशी विनंती त्यांनी अमेरिकेला केली. 22 एप्रिलला पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी धर्म विचारुन गोळ्या झाडल्या. यात 26 निरपराध पर्यटकांचा मृत्यू झाला. भारताने दोन पाकिस्तानी नागरिकांसह तीन पाकिस्तानी हल्लेखोरांची ओळख पटवली आहे. या सगळ्यामागे पाकिस्तानच आहे. पण सवयीप्रमाणे आपला या सगळ्याशी काहीही संबंध नाही असा कांगावा पाकिस्तान करत आहे.
