पाकिस्तानच्या इज्जतीचा फालूदा, पैसे न भागवल्याने ‘मित्र’ देशाकडून प्रवासी विमान जप्त

| Updated on: Jan 15, 2021 | 6:16 PM

पाकिस्तानचा पुन्हा एकदा इज्जतीचा फालूदा झाला आहे. यावेळी तर मित्रदेश असलेल्या मलेशियानेच पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे (Pakistani PIA plane seized by Malaysia)

पाकिस्तानच्या इज्जतीचा फालूदा, पैसे न भागवल्याने मित्र देशाकडून प्रवासी विमान जप्त
Follow us on

कुआलालंपूर (मलेशिया) : पाकिस्तानचा पुन्हा एकदा इज्जतीचा फालूदा झाला आहे. यावेळी तर मित्रदेश असलेल्या मलेशियानेच पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. मलेशियाने पाकिस्तान इंटरनॅशनल एयरलायन्सचं (पीआयए) बोईंग-777 हे विमान जप्त केलं आहे. खरंतर पाकिस्तानने बोईंग-777 या विमानाचं भाडं चुकवलं नव्हतं. याप्रकरणी मलेशियाच्या स्थानिक कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे (Pakistani PIA plane seized by Malaysia).

पाकिस्तानच्या कराची विमानतळावरुन बोईंग-777 हे विमान कुआलालंपुर विमानतळावर आलं होतं. हे विमान परत पाकिस्तानच्या दिशेला उड्डाण करणार होतं. उड्डाणाची पूर्ण तयारी झाली होती. सर्व प्रवाशी विमानात बसले आणि विमानाचा सर्व स्टाफ सज्ज देखील झाला. मात्र, अचानक मलेशियाच्या अधिकाऱ्यांनी विमान थांबवलं. त्यांनी सर्व स्टाफ आणि प्रवाशांना विमानातून खाली उतरवलं. त्यानंतर विमान जप्त करण्यात आलं. विशेष म्हणजे विमान जप्त केल्याने विमानातील 18 कर्मचारी देखील कुआलालंपुर येथे अडकले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार 14 दिवस क्वारंटाईन राहावं लागणार आहे (Pakistani PIA plane seized by Malaysia).

पाकिस्तानच्या नाचक्कीची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील अनेकवेळा पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. काही दिवसांपूर्वी कराचीत एका विमानाचा अपघात झाला होता. त्यावेळी पाकिस्तानच्या नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी केलेल्या दाव्यावर संपूर्ण जग हसलं होतं. पीआएमधील 40 टक्के पायलट हे बनावट परवानाधारक असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे नागरी उड्डाण मंत्री सरवर खान यांनी केलं होतं.

ठळक बातम्या, बेधडक विश्लेषण, पाहा 8 PM स्पेशल रिपोर्ट, टीव्ही 9 मराठीवर

सौदी अरेबियाचाही झटका

याआधी सौदी अरेबियानेदेखील पाकिस्तानला मोठा झटका दिला होता. पाकिस्तानने काश्मीर मुद्द्यावरुन घेतलेल्या भूमिकेवर सौदी अरिबियाने नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे सौदी अरेबियाने पाकिस्तानला 2018 मध्ये दिलेली 3 मिलियन डॉलरची आर्थिक मदत परत मागितली होती. त्यानंतर पाकिस्तानने चीनकडून कर्ज काढून सौदी अरेबियाला पैसे परत केले होते.

हेही वाचा : तुम्हालाही आलाय ‘हा’ मेसेज, तर सावधान! तुमचे पैसे चोरीला जाऊ शकतात, गृह मंत्रालयाचा इशारा