
पेरूच्या हुआरल शहरात घडलेल्या एका घटनेने माणसांच्या आणि पाळीव प्राण्यांच्या नात्याची एक वेगळीच बाजू समोर आणली आहे. ही घटना ऐकून माणूस आणि प्राणी यांच्यातील अतूट नात्यावरील तुमचा विश्वास अधिकच दृढ होईल. एका पाळीव कुत्र्याने आपल्या जीवाची पर्वा न करता, एका कुटुंबालाच नाही तर आजूबाजूला राहणाऱ्या सर्वांनाच एका मोठ्या संकटातून वाचवले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पेरूच्या हुआरल प्रसिद्ध पत्रकार कार्लोस अल्बर्टो मेसियास जराटे राहतात. काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या घराला लक्ष्य करत हल्ला चढवला. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने रात्रीच्या वेळी त्यांच्या घराच्या दिशेने एक पेटती डायनामाईटची काडी फेकली. ही पेटती काडी त्यांच्या मंचिस नावाच्या पाळीव कुत्र्याने पाहिली. यानंतर त्याने प्रसंगावधान राखत पेटलेली डायनामाईटची काडी आपल्या तोंडात पकडली. त्याने ती काडी चावून विझवण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या धाडसी प्रयत्नांमुळे काडीचा स्फोट झाला नाही. यामुळे एक मोठा अनर्थ टळला.
जर ही काडी घराच्या आत किंवा आसपास फुटली असती, तर मोठा विध्वंस झाला असता. पण, जराटे यांच्या कुटुंबातील १० जणांचे आणि इतर दोन पाळीव कुत्र्यांचे नशीब बलवत्तर होते. त्यामुळे ते यातून बचावले. ही थरारक घटना घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. त्याचे फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंचिसच्या या शौर्यामुळे कुटुंबाचा जीव वाचला असला तरी त्याला मात्र याची मोठी किंमत मोजावी लागली.
डायनामाईटच्या तीव्र उष्णतेमुळे त्याचा गळा गंभीररीत्या भाजला आहे. या दुखापतीमुळे त्याला आता भुंकताही येत नाही. पण या जखमांमुळे त्याच्या शौर्याची गाथा अधिक ठळकपणे समोर आली आहे. मंचिसच्या या शौर्यामुळे तो रातोरात सेलिब्रिटी बनला आहे. त्याचे व्हायरल फुटेज पाहून अनेक लोक भावूक झाले आहेत आणि त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अनेक युजर्सनी कुत्र्याची निष्ठा आणि प्रामाणिकपणा यावर भाष्य केले आहे. “कुत्रे हे माणसांचे सर्वात चांगले आणि निष्ठावान मित्र असतात,” अशा अनेक कमेंट्सनी या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.