
चीनमध्ये सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेची(SCO) शिखर परिषद ही राजनैतिक आघाडीवर भारतासाठी अत्यंत महत्वाची ठरली. या शिखर परिषदेच्या दुसऱ्या दिवशी संयुक्त जाहीरनाम्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला आहे. 2 महीने पहिले SCO च्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत यावर कोणताही करार झाला नव्हता आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घोषणापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिला होता. तसेच या परिषदेत भारताने पाश्चात्य दबाव नाकारला आणि संपूर्ण जगाने रशिया व भारत यांच्यातील मैत्रीदेखील पाहिली.
चीनमध्ये झालेल्या SCO समिटमध्ये भारताच्या पारड्यात काय प़डलं, ते समजून घेऊया.
1. पाकिस्तानला घेरलं
या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे नाव न घेताच त्यांचा बुरखा फाडला. आपल्या भाषणात मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे नाव न घेता त्याचा पर्दाफाश केला.
मोदी म्हणाले की, भारत गेल्या चार दशकांपासून दहशतवादाने त्रस्त आहे आणि पहलगाममध्ये अलिकडेच झालेली निष्पाप नागरिकांची हत्या म्हणजे मानवतेवर हल्ला आहे. मोदी म्हणाले, ‘हा हल्ला केवळ भारताच्या विवेकालाच आव्हान नव्हे तर मानवतेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक देशाला उघड आव्हान, त्यांच्यावरचा हा हल्ला होता. दहशतवादासाठी कोणतेही दुहेरी मापदंड स्वीकारले जाणार नाहीत.’ असेही त्यांनी स्पष्ट केलं.
या बैठकीस पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफही उपस्थित होते, मात्र त्यांची देहबोली बरंच काही दर्शवत होती. या परिषेदेसाठी आलेले पंतप्रधान मोदी आणि पुतिन एकमेकांना प्रेमाने भेटले, एकमेकांना मिठी मारली आणि हात धरून पुढे चालत गेले, पण पाकिस्तानी पंतप्रधान एका कोपऱ्यात उभे राहिले आणि त्यांच्याशी बोलले देखील नाहीत. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोण मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण आहे, हे यातून स्पष्टपणे दिसून आले.
2. रशिया-भारताची मैत्री
या बैठकीतील राजनैतिकतेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाट पाहत होते. ते सुमारे 10 मिनिटे त्यांच्या गाडीत बसून राहिले. त्यानंतर मोदी आले आणि दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण भेट झाली. त्यानंतर पंत्परधान मोदी थेट पुतीन यांच्या गा़ीत बसले आणि त्यांच्यात सुमारे 40-45 मिनिटे, दीर्घ चर्चा झाली.
या बैठकीमुळे पाश्चिमात्य देशांना एक मोठा संदेश मिळाला की, भारत-रशिया मैत्री ही “टाइम टेस्टेड पार्टनरशिप” आहे. कठीण काळात रशिया भारतासोबत होता आणि आता जेव्हा रशिया कठीण काळातून जात आहे, तेव्हा भारतही रशियाची साथ सोडणार नाही. येत्या डिसेंबरमध्ये पुतिन भारताला भेट देणार असून त्यावेळी नवीन संरक्षण आणि व्यापार करारांवर स्वाक्षरी केली जाईल.
3. पाश्चात्य दबाव नाकारला
SCO शिखर परिषदेदरम्यान मोदी, पुतिन आणि जिनपिंग या तिघांमधील झालेली उबदार भेट हा हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय होता. रशियन राजनयिकांनी याला “नवीन जागतिक व्यवस्थेची सुरुवात” म्हटले. या बैठकीत अत्यंत सहजपणे, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा झाली, हा चीन, भारत आणि रशियादरम्यानच्या संबंधांमधील सकारात्मक संकेत म्हणून पाहिला जात आहे.
या संपूर्ण घटनेने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पाश्चात्य देशांना एक संदेश देण्यात आला की, भारत स्वतंत्र परराष्ट्र धोरणाचे पालन करत आहे. दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न असूनही, भारताने रशियाशी आपले संबंध मजबूत केले आहेत.
4.भारत-रशिया संरक्षण सहकार्य
यावेळी संरक्षण भागीदारीवरही भर देण्यात आला. ब्रह्मोस क्षेपणास्त्रापासून ते एस-400 हवाई संरक्षण प्रणालीपर्यंत, भारत-रशिया सहकार्याची ताकद पुन्हा एकदा स्पष्ट झाली. पुतिन डिसेंबरमध्ये भारताला भेट देणार असून, त्यावेळी नवीन संरक्षण आणि व्यापार करारांना अंतिम स्वरूप दिले जाईल. अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी भारतावर रशियापासून दूर राहण्यासाठी दबाव आणला होता, परंतु मोदी-पुतिन यांनी त्यांच्या नाकावर टिच्चून घेतलेल्या या भेटीने हे दाखवून दिले की भारत आपली राजनैतिकता स्वतंत्रपणे चालवतो आणि राष्ट्रीय हितांशी तडजोड करणार नाही.
राष्ट्राध्यक्ष पुतिन हे SCO चौकटीत पेमेंट आणि सेटलमेंटसाठी स्वतःची प्रणाली विकसित करण्याबद्दल बोलले. बहुतेक SCO देश आधीच त्यांच्या स्वतःच्या चलनांमध्ये व्यापार करत आहेत. डॉलर-आधारित अर्थव्यवस्थेच्या वर्चस्वाला आव्हान देण्याच्या दिशेने टाकलेले हे एक पाऊल आहे. या मुद्द्यामुळे पाश्चात्य देशांची, विशेषतः अमेरिकेची चिंता वाढली आहे.
5. चीन आणि जागतिक वैश्विक समीकरण
तियानजिनमध्ये मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग या तीन मोठ्या नेत्यांमधील चर्चेचे वर्णन रशियन राजनयिकांनी “नवीन जागतिक व्यवस्थेची सुरुवात” असे केले. चीन, भारत आणि रशियाच्या प्रमुख नेत्यांची पहिल्यांदाच एवढ्या चांगल्या वातावरणात भेट झाली, खेळीमेळीत चर्चाही झाली. मात्र या तीन नेत्यांची ही भेट आणि मोदी-पुतिन यांची मिठी , हे ट्रम्पना चांगलेच झोंबले असणार.
रशिया-युक्रेन युद्धाचे निमित्त करून ट्रम्प यांनी रशियाच्या तेलाचा मुद्दा बनवून भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला. परंतु पुतिन-मोदी बैठकीनंतर भारताने जारी केलेल्या प्रश्नावलीत स्पष्टपणे म्हटले होते की दोन्ही नेत्यांनी भारत आणि रशियामधील विशेष धोरणात्मक मैत्री आणखी मजबूत करण्याचा संकल्प केला आहे.