Russia Poland War : पोलंडच्या एका धमकीने पुतिन टेन्शनमध्ये; आर्टिकल 4 काय आहे? तिसरं महायुद्ध…
पोलंड आणि रशिया या दोन देशांत सध्या तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. असे असतानाच आता पोलंडच्या पंतप्रधानांनी आर्टीकल-4 लागू करण्याचा उल्लेख केलाय. त्यामुळे आता आर्टिकल-4 म्हणजे काय, असे विचारले जात आहे.

Poland And Russia War : एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध भडकलेले असताना आता दुसरीकडे रशिया आणि पोलंड या दोन देशांत कमालीची तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. रशियाचे ड्रोन पोलंडच्या हवाई क्षेत्रात आल्याने या देशाने कडक पवित्रा धारण केला आहे. त्यामुळे आता रशिया आणि पोलंड या दोन्ही देशांतील संबंध बिघडले आहेत. पोलंडने रशियाचे काही ड्रोन हाणून पाडल्याने रशियादेखील आक्रमक झाली आहे. असे असतानाच आता पोलंडने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या एका निर्णयामुळे आता जगावर तिसऱ्या महायुद्धाचे ढग गडद झाले की काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार 9 आणि 10 सप्टेंबर रोजीच्या रात्री रशियाच्या एकूण 19 ड्रोनने पोलंडच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला. या ड्रोन्सना पोलंडच्या लष्कराने हाणून पाडले. आमच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केल्याने आम्ही कारवाई केली, असे पोलंडचे मत आहे. ही घटना घडल्यानंतर पोलंडने लगेच आपले हवाई क्षेत्र बंद करत नागरिकांना अलर्ट दिला. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार ड्रोनचे अवशेष जमा करण्यात आले आहेत. या सर्व घडामोडी घडत असताना आता पोलंडने नाटो संघटनेचे कलम-4 लागू करण्याची घोषणा केली आहे. पोलंडच्या या निर्णयामुळे आता संपूर्ण जगाच्या भुवया उंचावल्या आहेत. पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी रशियाच्या हल्ल्याविरोधात नाटोच्या कलम-4 चा उपयोग करण्याबाबत विधान केले आहे. रशिया या हल्ल्याच्या माध्यमातून उघडपणे चिथावणी देत आहे. ही घटना अगोदरच्या घटनांपेक्षा अधिक गंभीर आहे. त्यामुळे शक्य असलेले पाऊल उचलले जाईल, असे टस्क यांनी सांगितले आहे.
नाटोचे कलम-4 आणि कलम 5 काय आहे?
नाटो संघटनेच्या कलम चारमध्ये सल्लामसलतीबाबत माहिती तरतूद आहे. नाटो सदस्य असलेल्या देशांपैकी एखाद्या देशाला धोका आहे का? याबाबत या चौथ्या कलमाअंतर्गत चर्चा केली जाते. तसेच संभाव्य धोके आणि परिस्थिती तसेच नाटो सदस्यांकडून लढा देण्याबाबतची पद्धत यावरही चौथ्या कलमाअंतर्गत चर्चा होते. नाटो संघटनेच्या कार्यपद्धतीच्या कलम-5 मध्ये एखाद्या देशावर हल्ला झाल्यास लष्करी मदत पुरवण्याबाबत तरतूद आहे. म्हणजेच पोलंड देशाने चौथ्या कलमाचा वापर करण्याचा उल्लेक केल्यामुळे आता युद्धाचे ढग गडत होत असल्याचे मत काही तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
