डोनाल्ड ट्रम्प यांची तळपायाची आग मस्तकात, नोबेल पुरस्कारासाठी थयथयाट, थेट म्हणाले, त्याने उद्ध्वस्त…
डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच अत्यंत धक्कादायक असे विधान करत एकच खळबळ उडवली. नोबेल शांतता पुरस्कार मिळवण्यासाठी ते जोरदार प्रयत्न करत आहेत. मात्र, पुरस्कार मिळण्याची आशा नसल्याने त्यांनी थेट ओबामा यांच्यावर टीका केलीये.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे मागील काही दिवसांपासून सतत नोबेल शांती पुरस्कार मागत आहेत. हेच नाही तर आता त्यांनी नुकताच मोठा दावा करत म्हटले की, मी जगातील मोठी आठ युद्ध रोखली आहेत. त्यामध्ये इस्त्रायल आणि हमास यांचाही समावेश आहे. काही दिवसांपासून गाझा पट्टीत अशांत होती, तिला शांत करण्याचे काम मी केले. मात्र, नोबेल पुरस्कार मिळण्याची आशा संपल्यानंतर आता ते थेट टीका करताना दिसत आहेत. नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा थयथयाट बघायला मिळत आहे. यंदाच्या वर्षीचे नोबेल पुरस्कार जाहीर होण्यासाठी आता अवघे काही मिनिटे शिल्लक असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चांगलाच चढल्याचे बघायला मिळतंय.
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांसोबत बोलताना थेट म्हटले की, मी आठ युद्धे जगातील थांबवली आहेत. पण हे सर्व कोणत्याही पुरस्कारासाठी नक्कीच केले नाही. ट्रम्प यांनी तक्रार करत थेट म्हटले की, बराक ओबामा यांना ज्यावेळी नोबेल पुरस्कार मिळाला होता, त्यावेळी त्यांना अध्यक्ष होऊन काही दिवसांचाच कालावधी झाला होता. तरीही त्यांना पुरस्कार देण्यात आला. काहीही न केल्याबद्दल ओबामा यांना पुरस्कार मिळाला.
खरोखरच मला माहिती नाही की, ओबामा यांनी असे काय केले होते की, त्यांना तो पुरस्कार मिळाला. पुढे खळबळजनक विधान करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, नोबेल शांतता पुरस्कार ओबामा यांना आपल्या देशाला उद्ध्वस्थ करण्यासाठी मिळाला होता, बाकी दुसरे तर त्यांनी काहीच केले नाही. ओबामा यांंना 2009 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात त्यांना हा पुरस्कार मिळाला.
गेल्या महिन्यात, संयुक्त राष्ट्रांना संबोधित करताना त्यांनी दावा केला होता की, त्यांना नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले आहे. मात्र, आता आशा मावळली त्यांना नोबेल पुरस्कार मिळण्याची. यामध्येच आता त्यांची चिडचिड अधिक वाढल्याचे बघायला मिळतंय. त्यांनी थेट ओबामा यांच्यावरच टीका केली. डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून भारतासह अनेक देशांना टॅरिफच्या माध्यमातून धमक्या देताना दिसत आहेत. त्यामुळेच त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळणार नसल्याची जोरदार एक चर्चा आहे.
