
India-bangladesh row : बांगलादेशातील अल्पसंख्याक असलेल्या हिंदू लोकांवर अत्याचार वाढत आहेत. या दरम्यान आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे वरिष्ठ संयुक्त सरचिटणीस रुहुल कबीर रिझवी यांनी, आपल्या पत्नीची भारतीय साडी जाळून भारताचा निषेध केलाय. इतकंच नाही तर त्यांनी लोकांना भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे देखील आवाहन केले आहे. त्रिपुरामध्ये बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात कथित तोडफोड आणि बांगलादेशी राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा निषेध करत रिझवी यांनी भारताविरुद्ध आंदोलन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिझवी यांनी जाहीरपणे आपल्या पत्नीची साडी जाळली. लोकांना भारतातून येणाऱ्या वस्तू खरेदी करू नका असे देखील आवाहन केले. ते म्हणाले की, ज्यांनी आमचा राष्ट्रध्वज फाडला त्यांच्या कोणत्याही वस्तू आम्ही घेणार नाही. आमच्या माता-भगिनी यापुढे भारतीय साड्या नेसणार नाहीत. भारतीय साबण किंवा टूथपेस्ट वापरणार नाहीत. आम्ही स्वतः मिरची आणि पपई देखील पिकवू. आम्हाला त्यांच्या वस्तूंची गरज नाही. भारताने बांगलादेशचे सार्वभौमत्व कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाय.
रिझवी म्हणाले की, बांगलादेश हा स्वावलंबी देश आहे. आपण आपल्याला आवश्यक असलेले उत्पादन करू शकतो. भारतीय उत्पादनांना पाठिंबा देण्याऐवजी आपण आपल्या अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केली पाहिजे. असे ही ते म्हणाले.
रिझवी यांनी भारतीय नेते आणि प्रसारमाध्यमांवर ही टीका केली. बांगलादेश इतर देशांच्या सार्वभौमत्वाचा आदर करतो. पण त्या बदल्यात इतर देशांकडूनही अशीच अपेक्षा आहे. आम्ही कधीही भारतीय ध्वजाचा अपमान करणार नाही. पण आम्ही आमच्या देशाविरुद्ध चुकीच्या कारवाया सहन करणार नाही. भारतीय उत्पादनांवर बहिष्कार हे शांततापूर्ण पण सर्वात शक्तिशाली उत्तर आहे. बांगलादेश कोणत्याही शक्तीपुढे झुकणार नाही. आपण दिवसातून एकदाच जेवू पण अभिमानाने उभे राहू आणि स्वावलंबी राहू.
आगरतळा येथील बांगलादेशच्या सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसून काही लोकांनी तोडफोड केली होती. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यानंतर याविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. या प्रकरणात पोलिसांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून घटनेचा तपास सुरू आहे.