दगडफेक, जाळपोळ, अश्रूधूर… पाकिस्तानात हिंसा भडकली, लाहौर बनले युद्धभूमी; अटक टाळण्यासाठी इम्रान खान यांची खेळी?

| Updated on: Mar 15, 2023 | 9:24 AM

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना मोठ्या धर्मसंकटाला सामोरे जावं लागलं आहे. या पोलिसांना इम्रान समर्थकांशी भिडावं लागलं आहे. इम्रान समर्थकांनी प्रचंड दगडफेक करत जाळपोळ केली. त्यामुळे अनेक पोलीस जखमी झाले आहेत.

दगडफेक, जाळपोळ, अश्रूधूर... पाकिस्तानात हिंसा भडकली, लाहौर बनले युद्धभूमी; अटक टाळण्यासाठी इम्रान खान यांची खेळी?
Imran Khan
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

लाहौर : तोशखाना प्रकरणात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इम्रान खान समर्थक भडकले आहेत. इम्रान खान यांना अटक करण्यासाठी जमान पार्क येथील त्यांच्या घराबाहेर पोलीस फोर्स बोलावण्यात आली आहे. इम्रान खान यांच्या समर्थकांनी काल अनेक तास आंदोलन केल्यामुळे पोलिसांना खान यांना अटक करता आली नव्हती. या आंदोलकांनी रस्त्यावर उतरून प्रचंड प्रमाणात दगडफेक केली. अनेक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. रस्ते बंद ठेवण्यात आले. दुकानेही बंद ठेवण्यात आली. लाहौर जणू काय युद्धभूमी झाले की काय असं वातावरण होतं.

पाकिस्तानची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे. तर आता राजकीय स्थितीही वाईट झाली आहे. लाहौर गेल्या 14 तासांपासून युद्धभूमी बनले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यासाठी पोलिसांचा आटापिटा सुरू आहे. मात्र, इम्रान यांच्या घराबाहेर प्रचंड मोठा जनसमुदाय असल्याने त्यांना अटक करणं कठिण होऊन बसलं आहे. मात्र, पोलिसांनीही इम्रान यांच्या घराची घेराबंदी केली आहे. जेव्हा पोलीस इम्रान यांना अटक करण्यासाठी घटनास्थळी आले. तेव्हा इम्रान यांचे समर्थक थेट पोलिसांनाच भिडले. त्यामुळे पोलिसांनीही या समर्थकांवर लाठीमार केला. तर इम्रान समर्थकांनी दगडफेक करत पोलिसांना प्रत्युत्तर दिलं. या हल्ल्यात दोन्हीकडची माणसं जखमी झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

लाठीमार आणि दगडफेक

इम्रान खान यांना अटक करण्यासाठी अनेक तास प्रयत्न करूनही पोलीस त्यांना अटक करू शकले नाही. इम्रान समर्थकांनी रस्ता अडवून धरल्याने पोलिसांना काहीच करता येत नव्हते. विशेष म्हणजे या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. अश्रूधुराचे नळकांडे फोडले. पाण्याचे फवारे मारले. मात्र तरीही पोलीस त्यांना पांगवू शकले नाही. उलट जमावाने पोलिसांच्या दिशेने प्रचंड दगडफेक केली. या दगडफेकीत इस्लामाबादचे पोलीस उपमहानिरीक्षक शहजाद बुखारी जखमी झाले आहेतद. या हाणामारीत पोलीस आणि इम्रान समर्थक गंभीर जखमी झाले आहेत.

माझ्या हत्येचा कट

दरम्यान, ही हिंसा भडकलेली असतानाच इम्रान खान यांनी एक व्हिडीओ जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मला तुरुंगात डांबून माझी हत्या करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. या षडयंत्राच्या मागे पाकिस्तानचं विद्यमान सरकार आहे, असा गंभीर आरोप इम्रान खान यांनी केला आहे. तसेच आपण अटक करून घ्यायला मानसिकरित्या तयार होतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यासाठी बाहेर पडा

खऱ्या स्वातंत्र्यासाठी तुम्ही घरातून बाहेर पडा. सरकारला वाटतंय माझ्या अटकेनंतर देश शांत होईल. पण तसे होणार नाही, हे त्यांना दाखवून द्या. जर मला काही झालं किंवा मला तुरुंगात ठार मारण्यात आलं तर इम्रान खानशिवाय आम्ही संघर्ष करू शकतो, हे तुम्ही दाखवून द्या. देशासाठी निर्णय घेणाऱ्या एका व्यक्तीची गुलामी आम्ही सहन करणार नाही, हे सुद्धा दाखवून द्या, असं आवाहन त्यांनी केलं आहे.