
Israel Qatar Attack : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. काहीही झालं तरी आम्ही हमासचा नायनाट करणारच असा निश्चय इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी केला आहे. याच निश्चयानंतर त्यांनी आता कतारची राजधानी दोहा या शहरावरही हल्ला केला आहे. दोहा येथे असलेल्या हमासच्या नेत्यांना संपवण्यासाठी हा हल्ला करण्यात आल्याचे नेतान्याहू यांनी सांगितले. दरम्यान, आता या हल्ल्यानंतर कतारने आक्रमक पवित्रा घेतला आहे. परिणामी कतार आणि इस्रायल यांच्यातील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. इस्रायलच्या या हल्ल्यानंतर आता कतार अॅक्शन मोडमध्ये आला असून या देशाने मुस्लीम राष्ट्राची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलच्या हल्ल्यानंतर आता कतरची राजधानी दोहा या शहरात रविवार आणि सोमवारी (13-14 सप्टेंबर) एक अरब-इस्लामिक शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. या शिखर परिषदेत इस्रायलने कतारवर केलेल्या हल्ल्यावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे. हमासचे नेते जिथे-जिथे असतील तिथे-तिथे इस्रायलकडून हल्ले केले जात आहेत. कतारने मात्र या हल्ल्याला चांगलेच गांभीर्याने घेतले असून आता मुस्लीम राष्ट्रांच्या या शिखर परिषदेत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
कतारवर करण्यात आलेल्या या हल्ल्याची जबाबदारी इस्रायली सैन्याने घेतली आहे. हमासच्या नेत्यांचा, अधिकाऱ्यांचा खात्मा करण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता, असे इस्रायलने सांगितलेले आहे. इस्रायलने या हल्ल्यात कतारमध्ये असलेल्या हमासच्या सदस्यांच्या निवासी कार्यालयांना लक्ष्य केले होते. तर कतारने मात्र या हल्ल्याचा जाहीर निषेध केला.
इस्रायलच्या हल्ल्यानंतर कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांनी प्रतिक्रिया दिली. इस्रायलने दोहा शहरावर हल्ला करून हमासकडे बंदी असलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुटकेचा मार्ग बंद केला आहे, असे शेख मोहम्मद म्हणाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
दरम्यान, हमास आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष संपावा यासाठी कतर आणि इजिप्त या दोन देशांनी याआधी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अमेरिकेच्या आग्रहानंतर कतारमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून हमासच्या राजकीय नेतृत्त्वाला आश्रय देण्यात आलेला आहे. हमास आणि इस्रायल यांच्यात चर्चा व्हावी असा यामागचा उद्देश आहे. मात्र कतारच्या पंतप्रधानांनी इस्रायलच्या या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे. असे असतानाच आता कतारमध्ये होणाऱ्या मुस्लीम राष्ट्राच्या शिखर परिषदेत काय होणार? याकडे जगाचे लक्ष लागले आहे.