
नेदरलँडमधील डच सेंट्रिस्ट पक्ष D66 चे नेते रॉब जेटन इतिहास घडवणार आहेत. वयाच्या ३८ व्या वर्षी ते देशाचे सर्वात तरुण आणि पहिले समलैंगिक पंतप्रधान बनणार आहेत. २९ ऑक्टोबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाने विजय मिळवला आहे. रॉब जेटन यांनी पत्रकारांना सांगितले, “मी अत्यंत आनंदी आहे की आम्ही या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनलो आहोत. D66 साठी हा ऐतिहासिक निकाल आहे. त्याचबरोबर मला खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव होत आहे.”
मात्र, ही स्पर्धा अटीतटीची होती. जेटन यांनी इस्लामविरोधी पॉप्युलिस्ट गीर्ट वाइल्डर्सकडून विजय मिळवला आहे. वाइल्डर्स यांनी या निवडणुकीत स्थलांतरविरोधी धोरणांना प्रोत्साहन दिले होते आणि कुराणवर बंदी घालण्याची मागणीही केली होती. मात्र, अधिकृत निकाल सोमवारी, ३ नोव्हेंबरला जाहीर केले जातील, जेव्हा परदेशात राहणाऱ्या डच नागरिकांच्या डाक मतपत्रांची मोजणी होईल.
पक्षाला अव्वल स्थानावर नेले
फक्त दोन वर्षांपेक्षा कमी वेळेत जेटन यांनी आपल्या पक्षाला पाचव्या स्थानावरून डच राजकारणाच्या अव्वल स्थानावर नेऊन ठेवले आहे. त्यांनी माजी अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामाच्या ‘Yes, we can’ या घोषवाक्यापासून प्रेरणा घेऊन ‘Het kan wel’ (म्हणजे हे शक्य आहे) अशी घोषणा दिली. आपल्या मोहिमेत सकारात्मक संदेश दिला. त्यांनी वाइल्डर्सवर समाजात फूट पाडण्याचा आरोप केला. त्यांनी AFPशी बोलताना सांगितले की, “आम्ही खूप सकारात्मक मोहीम चालवली कारण गेल्या काही वर्षांत नेदरलँडमध्ये पसरलेल्या नकारात्मक वातावरणाला संपवायचे होते.” पुढे ते म्हणाले, “मी नेदरलँडला युरोपच्या केंद्रस्थानी परत आणू इच्छितो, कारण युरोपीय सहकार्याशिवाय आम्ही काहीच नाही.”
कोण आहेत रॉब जेटन?
रॉब जेटन यांचा जन्म २५ मार्च १९८७ रोजी नेदरलँडच्या दक्षिण प्रांतातील ब्राबँटमधील एका छोट्या शहरात झाला. त्यांनी अल्पवयातच स्वतःला समलैंगिक (गे) म्हणून स्वीकारले. पुढे त्यांनी रॅडबाउड युनिव्हर्सिटीमधून लोक प्रशासन (Public Administration) मध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळवली. खूप कमी वयातच जेटन राजकारणात सक्रिय झाले होते. २०१७ मध्ये ते D66 पक्षाचे सर्वात तरुण खासदार बनले आणि नंतर माजी पंतप्रधान मार्क रुट्टे यांच्या सरकारमध्ये प्रभावशाली जलवायु मंत्री (climate minister) म्हणून काम केले.
जेटन यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास, त्यांची प्रेमकहाणी कोणापासूनही लपलेली नाही. ते ऑलिम्पियन निको कीनन यांना डेट करत आहेत. दोघांनी गेल्या वर्षी साखरपुडा केला. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी या जोडप्याने इंस्टाग्रामवर आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आणि कॅप्शन लिहिले, ‘Soon to be Mr & Mr.’