
Russia Attack Ukraine : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबावे यासाठी अलास्का येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात बैठक झाली. पण या बैठकीत या युद्धाबाबत कोणताही ठोस निर्णय झाला. मात्र आमच्यातील चर्चा ही सकारात्मक होती, असे ट्रम्प यांनी सांगितले. तसेच रशियानेही युद्धबंदी झाली पाहिजे, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान, युद्ध थांबले पाहिजे असे रशियाने सांगितलेले असले तरी अलास्का येथील बैठकीनंतर रशियाने युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. ट्रम्प आणि पुतिन यांची भेट होण्याआधी युक्रेनचे एक जहाज आणि बंदरावर हल्ला केला होता. आता ही बैठक संपल्यानंतर रशियाने युक्रेनला प्रत्युत्तर दिले आहे.
रशियाने युक्रेनसोबतचे युद्ध थांबायला हवे, अशी भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडे याच रशियाकडून युक्रेनवर हल्ले केले जात आहे. दोन्ही देशांतील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील चर्चेनंतर पुढच्याच काही तासांनी रशियाने युक्रेनवर हा हल्ला केला आहे. युकेनच्या हवाई दलाने या हल्ल्याबाबत माहिती दिली आहे. या माहितीनुसार रशियाने युक्रेनवर 85 ड्रोन आणि एक बॅलिस्टिक मिसाईल डागली. 15 ऑगस्टची संध्याकाळ आणि 16 ऑगस्टच्या सकाळी या कालाविधीत हे हल्ले करण्यात आले. रशियाने डागलेल्या ड्रोनपैकी युक्रेनच्या एअर डिफेन्स सिस्टिमने एकूण 61 ड्रोन नष्ट केले. उर्वरित ड्रोनने मात्र त्यांच्या लक्ष्यांवर हल्ला केला. यामुळे युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.
रशिया युक्रेनचा भूभाग काबीज करत आहे. आपल्या हल्ल्यांच्या माध्यमातून युक्रेनला खिळखिळं करण्याचा प्रयत्न रशियाकडून केला जात आहे. आता रशियाने युक्रेनच्या ड्नीप्रोपेत्रोव्स्क भागातील वोरोन या गावावर आम्ही नियंत्रण मिळवलं असल्याचं सांगितलंय. फेब्रुवारी 2022 मध्ये दोन्ही देशांत या युद्धाला सुरुवात झाली होती. तीन वर्ष झाले तरी हे युद्ध अजूनही चालूच आहे. या युद्धात आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर लाखो नागरिकांना आपले राहते घर सोडावे लागलेले आहे. पूर्व आणि दक्षिण युक्रेनमध्ये मोठा भूभाग आता रशियाच्या नियंत्रणात आहे. असे असताना आता या दोन्ही देशांत युद्ध कधी थांबणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.