रशिया युक्रेन युद्ध आणखी पेटणार, ‘हे’ शहर ताब्यात घेण्यासाठी पुतीन यांनी पाठवले 1.10 लाख सैनिक

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनमधील एक महत्वाचे शहर ताब्यात घेण्यासाठी 1 लाख 10 हजार सैनिक पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे.

रशिया युक्रेन युद्ध आणखी पेटणार, हे शहर ताब्यात घेण्यासाठी पुतीन यांनी पाठवले 1.10 लाख सैनिक
russia ukraine war putin soldiers
| Updated on: Jun 28, 2025 | 3:06 PM

गेल्या 3 वर्षांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून सतत हल्ले होत आहेत. अशातच आता आगामी काळात हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. रशियाने युक्रेनमधील एक महत्वाचे शहर ताब्यात घेण्यासाठी 1 लाख 10 हजार सैनिक पाठवले असल्याची माहिती समोर आली आहे. हे शहर कोणते आहे आणि ते ताब्यात घेणे का महत्वाचे आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

रशिया पूर्व युक्रेनमधील पोकरोव्स्क शहर ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र युक्रेनचे सैनिक रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे गेल्या 1 वर्षापासून सुरु असलेला रशियाचा प्रयत्न अपयशी ठरत आहे. अशातच आता रशियाने रणनीती बदलली असून पोकरोव्स्क शहर ताब्यात घेण्यासाठी एक लाखांवरून अधिक सैन्य पाठवले आहे. त्यामुळे आता रशियाला कोणत्याही किमतीत हे शहर आपल्या ताब्यात पाहिजे हे सिद्ध होत आहे.

हे शहर का महत्त्वाचे आहे?

मिळालेल्या माहितीनुसार पोकरोव्स्क हे एक छोटे शहर आहे मात्र या शहराची भौगोलिक स्थिती महत्त्वाची आहे. हे शहर डोनेस्तक प्रदेशात आहे. पोकरोव्स्क या शहरातून व्यापार चालतो, तसेच हे शहर रेल्वेचे एक मोठे केंद्र आहे, यामुळे युक्रेनच्या संरक्षणालाही मदत होत आहे. त्यामुळे रशिया या शहरावर कब्जा करु इच्छित आहे, हे शहर रशियाच्या ताब्यात आल्यास डोनेस्तक आणि लुहान्स्क या प्रांतावर वर्चस्व मिळवणे सोपे होणार आहे.

पोकरोव्स्क शहरावर ताबा मिळवणे कठीण

युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने अनेकदा पोकरोव्स्क शहरावर थेट हल्ला केला होता, परंतु प्रत्येक वेळी युक्रेनच्या सैन्याने परतून लावला. त्यामुळे आता रशियाने आपली रणनीती बदलली आहे. आता रशियन सैनिक दक्षिण आणि ईशान्य दिशेने शहराला वेढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता युक्रेनकडून प्रत्युत्तर मिळाल्यास हे युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे. युक्रेनियन सैन्याने अलीकडेच रशियाच्या कुर्स्क प्रदेशावर अचानक हल्ला केला होता, त्यामुळे रशियाला या भागातून 63 हजार सैनिकांना माघारी बोलवाले लागले होते. यामुळे पोकरोव्स्कवरील दबाव काही काळ कमी झाला होता. मात्र आता तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

पोकरोव्स्कची लोकसंख्या घटली

समोर आलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाले तेव्हा पोकरोव्स्क शहराती लोकसंख्या 60 हजारांच्या आसपास होती, मात्र आता या शहरातील लोकसंख्या घटली आहे. या शहरातील शेवटची कोकिंग कोळसा खाणही बंद झाली आहे. त्यामुळे खाणीतील कामगार दुसरीकडे स्थलांतरीत झाले आहे. आता या शहरात काही लष्करी जवान आणि कमी प्रमाणात नागरिक उरले आहेत.