Trump-Putin Talk : अखेर पुतिन यांच्यासमोर ट्रम्पना झुकावं लागलं, अमेरिकेचा दुटप्पीपणा दिसला, भारताला सांगतात तेल खरेदी करु नका आणि स्वत: आता..
Trump-Putin Talk : अमेरिकेचा दुटप्पीपणा पुन्हा एकदा दिसून आला आहे. रशियाला रोखण्याच्या नादात अमेरिकेची स्वत:ची कोंडी झाली. त्यामुळे ट्रम्प यांना स्वत:ला पुतिन यांना फोन करावा लागला. एकप्रकारे पुतिन यांच्यासमोर ट्रम्प झुकले.

भारताने रशियाकडून तेल खरेदी करु नये म्हणून अमेरिकेकडून सातत्याने दबाव टाकला जातो. अमेरिकेने खास त्यासाठी कायदा बनवला आहे. रशिया विरोधात आपण कठोर आहोत, हे डोनाल्ड ट्रम्प सातत्याने दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण प्रत्यक्षात मात्र ट्रम्प यांना पुतिन यांच्यासमोर झुकावं लागलय. अमेरिकी राष्ट्रपती ट्रम्प यांनी रशियन डिझेलवरील बंदी हटवली आहे. एप्रिल 2027 पर्यंत हा आदेश प्रभावी राहिलं. शुक्रवारी ट्रम्प यांनी रशियन राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ही घोषणा केली. रशिया अमेरिकेला डिझेलचा पुरवठा करेल असं सुद्धा ट्रम्प म्हणाले. रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या देशांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावण्याची तरतूद अमेरिकेने एका कायद्याद्वारे केली आहे.
ट्रम्प यांनी आपला सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर पोस्ट करुन रशियन राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती दिली. दोघांमध्ये ठरल्यानुसार, रशिया तात्काळ अमेरिका आणि जागतिक बाजारपेठेत 3,00,000 टन पेक्षा जास्त डिझेलचा पुरवठा करणार आहे. रशिया नोव्हेंबर महिन्यात पाच लाख टन अतिरिक्त डिझेलचा पुरवठा करेल. त्यानंतर तात्काळ 10 लाख टन डिझेलचा पुरवठा केला जाईल. इराण विरूद्धच्या युद्धामुळे अमेरिकेत इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या मध्यावधी निवडणुकीत हा महत्वाचा मुद्दा बनला आहे. अमेरिकेच्या वित्त विभागानुसार, रशियन डिझेल विक्रीवर असलेले प्रतिबंध एप्रिल 2027 पर्यंत हटवण्यात आले आहेत.
म्हणून जगभरात डिझेलच्या किंमती वाढल्या
अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटने रशियन डिझेल विक्रीवरील प्रतिबंध हटवल्याची घोषणा केली. रशिया तात्काळ 3,00,000 टन पेक्षा जास्त डिझेलचा पुरवठा करणार असं ट्रम्प म्हणाले. नोव्हेंबर महिन्यात 5,00,000 टन आणि त्यानंतर तात्काळ 10 लाख टन डीझेलचा पुरवठा केला जाईल. त्यानंतर रशिया आपल्या रिफायनरीच्या स्थितीनुसार आणखी 30 लाख टन डिझेलचा पुरवठा करेल असं ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’च्या पोस्टमध्ये म्हटलय. युक्रेनने रशियन रिफायनरीजवर हल्ले केल्याने जगभरात डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे मॉस्कोला डिझेल निर्यात रोखावी लागली आहे. सौदी अरेबियात रिफायनरीजवर हौथी बंडखोरांनी हल्ले केले. त्यामुळे इंधन पुरवठा आणखी कमी झाला.