
अमेरिका आणि रशिया हे दोन्ही देश जागतिक राजकारणात परस्परांचे विरोधक आहेत. युक्रेन युद्धामुळे हा तणाव आणखी वाढलेला असताना आता एक तेल टँकर दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं कारण ठरतोय. मागच्या आठवड्यात अमेरिकेने वेनेजुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना कैद केलं. त्यानंतर याच वेनेजुएलाच्या समुद्रात एक रशियन तेल टँकर अमेरिकेने ताब्यात घेतला आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या तेल टँकरसाठी आपली पाणबुडी सुद्धा पाठवली आहे. अमेरिकेने ताब्यात घेतलेल्या रशियन तेल टँकर मॅरिनेराचं भारताशी सुद्धा कनेक्शन आहे. या तेल टँकरवरील चालक दलाच्या पथकामध्ये तीन भारतीय आहेत. रशियाने गुरुवारी या घटनेवर गंभीर चिंता व्यक्त केली. अमेरिकेकडे समुद्री आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन करण्याची मागणी केली.
उत्तर अटलांटिकमध्ये अमेरिकी अतटरक्षक दलाने ताब्यात घेतलेल्या मॅरिनेरा तेल टँकरवरील चालक पथकाशी मानवीय व्यवहार करा, अशी मागणी रशियन परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी केली. टँकरच्या स्थितीबद्दल अमेरिकेला वारंवार माहिती दिली होती, असं रशियाने सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मेरिनेराच्या चालक पथकामध्ये 17 युक्रेनी नागरिक, सहा जॉर्जियन नागरिक, तीन भारतीय नागरिक आणि दोन रशियन नागरिक आहेत.
रशियन परराष्ट्र मंत्रालयाने काय म्हटलय?
अमेरिकेचा राष्ट्रीय प्रतिबंध कायदा आणि त्याच्या निकषांना आम्ही निराधार मानतो असं रशियाकडून सांगण्यात आलं. अमेरिकेसह अन्य पाश्चिमात्य देशांचे एकतर्फी प्रतिबंधात्मक उपाय बेकायद आहेत. खुल्या समुद्रात जहाज जप्त करण्याच्या प्रयत्नाला योग्य ठरवता येणार नाही असं रशियाने म्हटलं आहे. मेरिनेराला 24 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय कायदा आणि रशियन कायद्यानुसार राष्ट्रीय ध्वजातंर्गत प्रवासाची अस्थायी परवानगी मिळाली होती. तो तेल टँकर उत्तर अटलांटिकमध्ये आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रातून शांततामय मार्गाने जात होता. रशियन बंदराच्या दिशेने हे तेल टँकर येत होता, असं रशियन परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
डिसेंबर महिन्यात टँकर ताब्यात घेण्याचा प्रयत्न
बेला 1 (Bella 1) नावाचा हा टँकर वेनेजुएलामध्ये तेल लोड करण्यात अपयशी ठरला. हा टँकर रशियाच्या दिशेने जात होता. अमेरिकेला ‘डार्क फ्लीट’ च्या माध्यमातून बेकायद तेल व्यापार रोखायचा आहे.डिसेंबर महिन्यात अमेरिकी कोस्ट गार्डने हे रशियन जहाज ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.