
Vladimir Putin : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताने आपले सैन्य सज्ज ठेवले आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानातून भारताला पोकळ धमक्या दिल्या जात आहेत. दरम्यान, असे असतानाच आता जगातील बलाढ्य देशांपैकी एक असणाऱ्या रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन थेट भारतात येणार आहेत. एकीकडे भारत-पाकिस्तान यांच्यात तणावाची स्थिती असताना पुतीन यांनी भारतात येण्याच्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याच्या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार व्लादिमीर पुतीन हे लवकरच भारतात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केले होते. याच आमंत्रणाचा रशियाने स्वीकार केला असून याबाबतची माहिती रशियाचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय क्रेमलीनने दिली आहे. रशिया आणि भारत यांच्यात लवकरच द्विपक्षीय शिखर संमेलन होणार आहे. त्यासाठीच मोदी यांनी पुतीन यांना भारतात येण्यासाठी आमंत्रित केलं होतं. रशियाने हे आमंत्रण स्वीकारलं आहे.
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा रशियाने तीव्र निषेध केला आहे. तसेच दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया कायम भारतासोबत असेही रशियाने स्पष्ट केले आहे. दहशतवादाविरोधात लढाई करताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असंही रशियाने सांगितलंय. यासह भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर कोणत्याही बाहेरच्या शक्तीच्या प्रभाव पडणार नाही, असा विश्वासही रशियाने व्यक्त केला आहे.
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पुतीन यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला होता. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या होत्या. विशेष म्हणजे अशा स्थितीत दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी रशिया भारतासोबत आहे, असेही पुतीन यांनी स्पष्ट केले होते. या हल्ल्यातील दोषींना तसेच त्यांच्या समर्थकांना न्याच्या कक्षेत आणलं पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचे ढग आणखी गडद झाले आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.