मी केवळ दहशतवादी हल्ल्याच्या… शशि थरूर यांची ऑपरेशन सिंदूरवरील भूमिका आणि त्याचे परिणाम काय?

ऑपरेशन सिंदूरनंतर शशि थरूर यांच्या विधानांमुळे काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाला आहे. थरूर यांनी भारताच्या एअर स्ट्राईकचं समर्थन करत पाकिस्तानाच्या दहशतवादाचा निषेध केला. थरूर यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्टीकरण देत पूर्वीच्या सर्जिकल स्ट्राईकची तुलना केली आणि भारताच्या दृष्टिकोनातील बदल स्पष्ट केला. या घटनेने आंतरराष्ट्रीय पातळीवरही चर्चा निर्माण केली आहे.

मी केवळ दहशतवादी हल्ल्याच्या... शशि थरूर यांची ऑपरेशन सिंदूरवरील भूमिका आणि त्याचे परिणाम काय?
shashi tharoor
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 30, 2025 | 11:58 AM

ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये काय झालं होतं? भारताला पाकिस्तानवर हल्ला का करावा लागला? हल्ल्यानंतर पाकिस्तानचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचं कसं उघड झालं? याची माहिती जगाला देण्यासाठी भारताने जगातील काही प्रमुख देशात खासदारांचं प्रतिनिधी मंडळ पाठवलं आहे. एका शिष्टमंडळाचं नेतृत्व काँग्रेसचे नेते शशि थरूर करत आहेत. काँग्रेसने नाव दिलेलं नसतानाही थरूर यांचा भाजपने या शिष्टमंडळात समावेश केला आहे. त्यावरून थरूर यांच्यावर टीका होत आहे. पण थरूर यांनी त्याला सडेतोड उत्तर दिलं आहे. तसेच ऑपरेशन सिंदूरबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्याचे परिणामही दिसून येत आहेत.

शशि थरूर यांची काही विधाने चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य करत ऑपरेशन सिंदूर बाबतची भूमिकाच स्पष्ट केली आहे. पनामामध्ये एका दीर्घ आणि यशस्वी दिवसानंतर मला अर्ध्या रात्री इथून निघून सहा तासानंतर कोलंबियामध्ये बोगोटासाठी जायचं आहे. माझ्याकडे वास्तवात वेळ नाहीये. पण तरीही, ज्या कट्टरपंथीयांसाठी जे भूतकाळात LoC च्या पलिकडे भारताच्या शौर्यावरील माझ्या कथित अज्ञानतेवर भडकले आहेत – 1) मी स्पष्टपणे दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिशोधाच्या बाबत बोलत होतो, मागच्या युद्धाच्या बाबत नाही. 2) माझ्या टिप्पणींपूर्वी मी अलीकडील काही वर्षांत झालेल्या हल्ल्यांचा संदर्भ दिला होता, ज्यावेळी भारताने LoC आणि आंतरराष्ट्रीय सीमेबाबत असलेल्या आपल्या जबाबदार आणि सन्मानपूर्वक दृष्टिकोनामुळे संयम बाळगला आणि मर्यादित प्रतिसाद दिला. पण नेहमीप्रमाणे, टीकाकार आणि ट्रोल्स यांनी माझ्या विचारांना आणि शब्दांना तोडून-मोडून मांडले, आणि ते चालू द्या — त्यांचे स्वागत आहे. माझ्याकडे खरंच त्यापेक्षा महत्त्वाची कामं आहेत. शुभ रात्री, असं शशि थरूर यांनी म्हणत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.

आपण त्याच्याही पुढे गेलो

गेल्या काही वर्षात देशात बदल झाला आहे. आपल्याला किंमत चुकवावी लागेल याची जाणीव दहशतवाद्यांना झाली आहे. सप्टेंबर 2016मध्ये पहिल्यांदा भारताने एक दहशतवादी लॉन्च पॅडवर सर्जिकर स्ट्राइक करण्यासाठी LoCचं उल्लंघन केलं होतं. यापूर्वी भारताने असं कधीच केलं नव्हतं. कारगिल युद्धाच्यावेळी आम्ही LoC पार केली नव्हती. त्यानंतर जानेवारी 2019मध्ये पुलवामा हल्ला झाला. तेव्हा बालाकोट एअर स्ट्राईकच्यावेळी आम्ही केवळ LoC नव्हे तर आंतरराष्ट्रीय बॉर्डरही पार केली. यावेळी ऑपरेशन सिंदूरच्यावेळी आम्ही त्या दोन्हींच्याही पुढे निघून गेलो. आपण केवळ LoC आणि आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार केली नाही तर दहशतवाद्यांचे 9 अड्डेही उद्ध्वस्त केले. तसेच पाकिस्तानच्या पंजाबी गडावरही हल्ला चढवला, असंही थरूर म्हणाले.

थरूर यांच्या भूमिकेचे परिणाम

शशि थरूर यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर पाकिस्तानचा बुरखा फाडला आहे. भारताने दहशतवादी मारल्यानंतर पाकिस्तानने शोक का व्यक्त केला? दहशतवाद्यांना सलामी देण्यासाठी पाकिस्तानचे सैन्याधिकारी का उपस्थित होते? असे सवाल करत थरूर यांनी अतिरेकी आणि पाकिस्तानचं कनेक्शन उघडं केलं आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पोसत असल्याचं आता जगालाही कळू लागलं आहे.

तुम्ही एवढे बेईमान कसे होऊ शकता?

दरम्यान, शशि थरूर यांनी पनामामद्ये 2016च्या उरी सर्जिकल स्ट्राइक, 2019च्या बालाकोट एअर स्ट्राइक आणि ऑपरेशन सिंदूरवरून भारताचं कौतुक केलं. गेल्या काही वर्षात भारताचा दहशतवादाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. पूर्वी असं होत नव्हतं, असं थरूर यांनी म्हटलं होतं. त्यावरून काँग्रेस नेत्यांनी थरूर यांच्यावर टीका केली होती. तुम्ही एवढे बेईमान कसे होऊ शकता? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी विचारला होता.

काँग्रेस नेते उदित राज यांनी थरूर यांच्या विधानाला आक्षेप घेतला होता. तुम्हाला भाजपचा सुपर प्रवक्ता बनवावं किंवा तुम्ही भारतात येण्यापूर्वी तुम्हाला परराष्ट्र मंत्री म्हणून घोषित करावं, असं मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगेल. मोदींच्या पूर्वी भारताने एलओसी आणि आंतरराष्ट्री सीमा कधीच पार केली नाही, असं म्हणून तुम्ही काँग्रेसचा सोनेरी इतिहास कसा बदनाम करू शकता? ज्या पक्षाने तुम्हाला एवढं काही दिलं त्या पक्षाशी तुम्ही इतके बेईमान कसे होऊ शकता?, असा सवाल उदित राज यांनी केला होता.