भलेही तुम्ही हजारो किलोमीटर दूर असाल… पण आमच्या आसपासच आहात; सुनीता विल्यम्सला पंतप्रधान मोदींचं पत्र

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी बुच विल्मोर यांचे स्पेसएक्स क्रू कॅप्सूल पृथ्वीवर परत येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीतांना एक पत्र लिहून त्यांच्या सुरक्षित परतफेरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुनीता आणि बुच नऊ महिने आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर होते. सुनीताचे लँडिंग बुधवारी पहाटे साडे तीन वाजता (भारतीय वेळ) होणार आहे.

भलेही तुम्ही हजारो किलोमीटर दूर असाल... पण आमच्या आसपासच आहात; सुनीता विल्यम्सला पंतप्रधान मोदींचं पत्र
Sunita Williams
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 18, 2025 | 5:17 PM

अंतराळवीर सुनीता विल्यम्सचं स्पेसक्राफ्ट आज पृथ्वीच्या दिशेने यायला निघालं आहे. सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर यांचं अंतराळ यान पृथ्वीकडे वेगाने झेपावलं आहे. दोन्ही अंतराळवीर स्पेसएक्स क्रू कॅप्सूलने पृथ्वीवर येत आहेत. सुनीताच्या पृथ्वीवरील येण्याची संपूर्ण जग वाट पाहत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनीता विल्यम्सला लिहिलेल्या पत्राची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या या कन्येसाठी मोदींनी पत्र लिहून तिच्या वापसीच्या सदिच्छा दिल्या आहेत. तू हजारो मैल दूर आहेस. पण तरीही आमच्या आसपासच आहेस, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पत्रातून म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हे पत्र ट्विट केलं आहे. संपूर्ण जग सुनीता विल्यम्सच्या सुरक्षित परतण्याची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या या कन्येसाठी आपली चिंता व्यक्त केली आहे, असं जितेंद्र सिंह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सुनीताकडून आभार व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतराळवीर माइक मैसिमिनोच्या माध्यमातून सुनीता विल्यम्सला पत्र पाठवलं होतं. तुम्ही भलेही हजारो मैल दूर असाल. पण तुम्ही आमच्या आसपासच आहात, असं मोदींनी लिहिलंय. यावर जितेंद्र सिंह यांनी भाष्य केलं आहे. मोदींचं हे पत्र म्हणजे 1.4 अब्ज भारतीयांचा गौरवच आहे, असं सिंह म्हणाले. काही दिवसांपूर्वी मोदींनी एका कार्यक्रमात मॅसिमिनो यांची भेट घेतली. आणि माझं आणि भारतीय नागरिकांचं हे पत्र सुनीतापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली. सुनीताच्या सुरक्षित परतण्याची कामनात करतानाच मोदींनी भारताच्या या कन्येबाबतच्या अतूट नात्याची पुष्टी केली. सुनीतानेही मोदींच्या पत्रावर मोदींचे आणि भारतीयांचे आभार मानले आहेत.

 

सुनीताच्या लँडिंगवेळी वातावरण अनुकूल राहणार आहे. नासा सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. रविवारी नासाने निवेदन जारी केलं होतं. अंतराळवीर उद्या संध्याकाळी जवळपास 5.57 वाजता लँड करतील. म्हणजे भारतीय वेळेनुसार सुनीता बुधावारी पहाटे साडे तीन वाजता लँडिंग करेल. आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरवर दोन्ही अंतराळवीर नऊ महिन्यांपासून अधिक काळापासून आहेत.

केवळ 8 दिवसासाठी गेली होती

सुनीताने एक ईमेल केला होता. त्यावेळी तिने गेल्या नऊ महिन्यांपासून जोरदार वर्कआऊट करत असल्याचं म्हटलं होतं. वर्क आऊट करत असल्याने स्वत:ला बलशाली समजत असल्याचंही तिने सांगितलं होतं. दरम्यान, सुनीता आणि बुचचे क्रू-9 मिशन केवळ आठ दिवसासाठी होतं. पण त्याचे बोइंग स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. नासाने सुरक्षा कारणास्तव स्टारलाइनर रिकामं आणण्याचा निर्णय घेतला होता.