Sunita Williams : काऊंटडाऊन सुरू, सुनिता विल्यम्स पृथ्वीवर कधी उतरणार ?
भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिन्यांच्या अंतराळ मोहिमेनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर परत येणार आहेत. SpaceX चे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरणार आहे. त्यांचे अंतराळ यान 18 मार्च रोजी ISS पासून वेगळे होईल आणि 19 मार्च रोजी समुद्रात उतरेल. या संपूर्ण प्रक्रियेचे नासातर्फे लाईव्ह प्रसारण होणार आहे.

भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे तब्बल 9 महिन्यांनंतर पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता आणि बुच हे दोघेही आता स्पेसएक्सच्या ड्रॅगन यानातून पृथ्वीवर परततील. दोघांनी गेल्या वर्षी 5 जून रोजी केप कॅनवेरल येथून बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलमधून उड्डाण केले. ते आठ दिवसांच्या मिशनसाठी गेले होते मात्र, अंतराळ यानामधून हीलियमची गळती आणि वेग कमी झाल्यामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकले आहेत. त्यांच्या पृथ्वीवरील आगमनाची सर्वांनाच आतुरता होती. अखेर आता ते पृथ्वीवर परत येणार आहेत.
किती वेळात येणार सुनिता विल्यम्स ?
आज, अर्थात 18 मार्च रोजी भारतीय वेळेनुसार, 10:35 वाजता अंतराळयान आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून (ISS) वेगळे केले जाईल. ड्रॅगन अनडॉक करणे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये क्राफ्ट आणि रिकव्हरी टीमची तयारी, हवामान, समुद्राची परिस्थिती यांचा समावेश असतो. NASA आणि SpaceX क्रू-9 च्या परतीच्या जवळ स्प्लॅशडाउन स्थानाची पुष्टी करतील.
लाईव्ह प्रसारणही पाहू शकता
सकाळी 08.15 वाजता यानाचे झाकण बंद झाकण होील. यानंतर, सकाळी 10.35 वाजता अनडॉकिंग होईल, ज्यामध्ये वाहन ISS पासून वेगळे केले जाईल. 19 मार्च रोजी पहाटे 02.41 वाजता देवरबिट बर्न (वातावरणात वाहनाचा प्रवेश) होईल. पहाटे 03.27 वाजता हे यान समुद्रात उतरेल. पहाटे 05.00 वाजता पृथ्वीवर परतण्यासंदर्भात पत्रकार परिषद होईल. या सर्व गोष्टी घडल्यानंतर, सुनीता आणि बुच भारतीय वेळेनुसार 19 मार्च 2025 रोजी परततील. सुनीता आणि विल्मोर यांना पृथ्वीवर परतण्यासाठी एकूण 17 तास लागतील.
कुठे होणार यानाचं लँडिंग ?
पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर हे यान अमेरिकेतील फ्लोरिडा किनाऱ्याजवळ पाण्यात उतरणार आहे. यानंतर अंतराळवीरांना एकामागून एक अंतराळयानातून बाहेर काढले जाईल. NASA हॅच क्लोजर, अनडॉकिंग आणि स्प्लॅशडाउनसह संपूर्ण रिटर्न प्रक्रियेचे थेट कव्हरेज करणार आहे. यशस्वी लँडिंगनंतर, मिशननंतरच्या नियमित वैद्यकीय तपासणीसाठी क्रू काही दिवसांसाठी नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये पाठवले जाईल. अंतराळवीरांना एकाकीपणाच्या मानसिक आव्हानांव्यतिरिक्त, हाडे आणि स्नायू खराब होणे, रेडिएशन एक्सपोजर आणि जगण्यासाठी आव्हानात्मक परिस्थितीमुळे दृष्टी कमी होणे यांचा सामना करावा लागू शकतो.