
Donald Trump Speech : जागतिक राजकारणात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी त्यांच्याकडून होत असलेल्या प्रयत्नांमुळेही त्यांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. दरम्यान, सध्या संयुक्त राष्ट्रसंघांच्या सर्वसाधारण सभेत ट्रम्प यांनी केलेल्या भाषणाची संपूर्ण जगात दखल घेतली जात आहे. त्यांनी आपल्या भाषणात संयुक्त राष्ट्रसंघावर सडकून टीका केली. तसेच त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघ युद्ध थांबवण्यात यशस्वी ठरले नसल्याचेही मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्पटर अचानक बंद पडले. यामुळेदेखील ट्रम्प यांचे भाषण सध्या चर्चेचा मुद्दा ठरले आहे. टेलिप्रॉम्पटर बंद पडल्यानंतर ते भडकले आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाची काम करण्याची पद्धत ही बंद पडलेल्या या टेलिप्रॉम्पटरप्रमाणेच आहे. त्यामुळेच मला काम करावे लागते, असा टोला ट्रम्प यांनी आपल्या भाषणादरम्यान लगावला. तसेच मी आतापर्यंत सात महिन्यांत सात युद्ध थांबवले आहेत. लाखो लोकांचा जीव वाचवला आहे. हे युद्ध थांबवण्याचे काम संयुक्त राष्ट्रांचे होते. मात्र संयुक्त राष्ट्रसंघाची कार्यप्रमाणाली टेलिप्रॉम्पटरप्रमाणेच खराब आहे, असे मत यावेळी ट्रम्प यांनी व्यक्त केले.
पुडे बोलताना संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना जगात शांती नांदावी यासाठी करण्यात आली होती. मात्र हे काम आता मलाच करावे लागत आहे. संयुक्त राष्ट्रसंघ आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकत नाहीये. ते फक्त पत्र लिहीत आहे. पण पत्र लिहिण्याने युद्ध थांबत नसते, अशी टीकाही त्यांनी केली. ट्रम्प यांचे भाषण चालू असताना त्यांच्या पत्नी मेलेनिया ट्रम्प स्मितहास्य करत होत्या. भाषण करण्यासाठी आले असतानाच ट्रम्प यांच्यापुढे असलेले टेलिप्रॉम्पटर बंद पडले. त्यानंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱ्यांवरही मिश्कील भाष्य केले. टेलिप्रॉम्पटरची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर आहे, आता त्याची नोकरी धोक्यात आली आहे. पण टेलिप्रॉम्पटर बंद पडले असले तरी त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही, असेही ते मिश्किलपणे म्हणाले.
.@POTUS: “I don’t mind making this speech without a teleprompter — because the teleprompter is not working… I can only say that whoever is operating this teleprompter is in big trouble.” 🤣 pic.twitter.com/XQcLsT5lug
— Rapid Response 47 (@RapidResponse47) September 23, 2025
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा नोबेल पारितोषकाचा उल्लेख केला. मी लाखो लोकांचा जीव वाचवण्याचे काम केले आहे. अजूनही हे काम चालूच आहे. युद्ध संपल्यानंतर लोक जेव्हा आपल्या कुटुंबाजवळ जातात तेव्हा त्यांना आनंद होतो. मला हाच आनंद एखाद्या नोबेल पुरस्कारापेक्षाही महत्त्वाचा आहे. पण लोकांना वाटते की मला नोबेल पुरस्कार मिळावा. यावेळी त्यांनी युक्रेन-रशिया युद्धावरही भाष्य केले. रशिया युक्रेनच्या लोकांचा जीव घेत आहे. तरीदेखील युरोपीय देश रशियाकडून तेलखरेदी करतच आहेत, अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.