प्रीमियर लीगच्या व्हिक्ट्री परेडमध्ये घुसली कार; 50 जण जखमी, धक्कादायक Video व्हायरल

प्रीमियर लीक जिंकल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी रस्त्यावर लोक जमले होते. तितक्यात भरधाव कार त्या गर्दीत घुसली आणि ५० हून अधिक लोकांना चिरडलं. या घटनेचा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रीमियर लीगच्या व्हिक्ट्री परेडमध्ये घुसली कार; 50 जण जखमी, धक्कादायक Video व्हायरल
Liverpool accident
Image Credit source: Twitter
| Updated on: May 27, 2025 | 10:43 AM

सोमवारी (26 मे) रात्री ब्रिटनच्या लिव्हरपूल शहरात आनंदाचं वातावरण असताना अत्यंत दुर्दैवी घटना घडली. प्रीमियर लीग जिंकल्यानंतर टीम आणि कर्मचारी एका ओपन-टॉप बसमधून शहराच्या मध्यभागी विजयी परेड करत होते. रस्त्याच्या कडेला हजारो चाहते त्यांची एक झलक पाहण्यासाठी आणि विजयाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी जमले होते. त्याच वेळी एक भरधाव गाडी त्या गर्दीत शिरली आणि क्षणात आनंदाचं हे दृश्य शोकात बदललं. या घटनेत जवळपास 50 जण जखमी झाले असून त्यात चार लहान मुलांचाही समावेश आहे. याप्रकरणी मर्सिसाइड पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि 53 वर्षीय ब्रिटीश कारचालकाला अटक केली.

मर्सिसाइड पोलिसांच्या मते ही घटना दहशतवादाशी संबंधित नाही. याप्रकरणी कॉन्स्टेबल जेनी सिम्स म्हणाल्या, “ही एक वेगळी घटना असल्याचं दिसतंय. आम्ही याच्याशी संबंधित इतर कोणाचाही शोध घेत नाही आहोत. याकडे दहशतवाद म्हणून पाहता येणार नाही. हे प्रकरण रस्ते अपघाताशी संबंधित आहे. याची चौकशी केली जात असून आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.” या घटनेशी संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये एक काळ्या रंगाची कार गर्दीत घुसते आणि लोकांना चिरडत ती पुढे जाताना स्पष्टपणे दिसून येत आहे.

नेमकं काय घडलं?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी 26 मे रोजी संध्याकाळी 6.03 वाजता एका व्यक्तीने आपली कार फुटबॉल चाहत्यांच्या गर्दीत भरधाव वेगाने नेली. यावेळी रस्त्यावरील अनेक लोक चिरडले गेले. या घटनेत दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. तर गाडीखाली चार जण अडकले गेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना बाहेर काढलं.

घटनेनंतर त्याठिकाणी लगेचच आपत्कालीन सेवा सक्रिय झाल्या आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात नेण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आपत्कालीन सेवांची तत्परता आणि पोलिसांच्या जलद कारवाईमुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होण्यापासून रोखली गेली आहे. पंतप्रधान केयर स्टारमर यांनी या प्रकरणावर दु:ख व्यक्त केलंय. लिव्हरपूलमध्ये जे घडलं ते अत्यंत भयानक असल्याचं त्यांनी म्हटलंय. ‘जखमींसोबत माझ्या संवेदना आहेत. या धक्कादायक घटनेनंतर त्वरित कारवाई केल्याबद्दल मी पोलीस आणि आपत्कालीन सेवांचे आभार मानतो’, असं त्यांनी लिहिलं आहे.