टॅरिफ संघर्षात ट्रम्पच्या सल्लागाराने ‘ब्राह्मण’ शब्द वापरून पेटवला वाद! विरोधकांच्या उमटल्या प्रतिक्रिया

भारत आणि अमेरिका यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. रशियाकडून तेल आयातीचा मुद्दा पुढे करून अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लादला आहे. असं असताना ट्रम्प यांच्या व्यापार सल्लागाराने तेल आयातीवरून भारतावर टीकास्त्र सोडलं होतं. आता यावर भारतातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

टॅरिफ संघर्षात ट्रम्पच्या सल्लागाराने ब्राह्मण शब्द वापरून पेटवला वाद! विरोधकांच्या उमटल्या प्रतिक्रिया
टॅरिफ संघर्षात ट्रम्पच्या सल्लागारांचं 'ब्राह्मण कार्ड' वापरून वाद, विरोधकांच्या उमटल्या प्रतिक्रिया
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 01, 2025 | 5:30 PM

अमेरिकेने दबावाची टॅरिफ नीति वापरल्यानंतरही भारताने माघार घेतली नाही. उलट रशियाकडून तेल आयात करणं सुरुच ठेवलं आहे. त्यामुळे अमेरिकेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. दुसरीकडे, रशिया आणि चीन या देशांशी जवळीक साधली आहे. त्यामुळे अमेरिकेला एकटं पाडण्याचा जागतिक पातळीवर प्लान सुरु आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्य डोनाल्ड ट्रम्प यांचे व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावर टीकास्त्र सोडलं आहे. मात्र यावेळी त्यांनी ब्राह्मण कार्ड वापरून टीका केल्याने खळबळ उडाली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, नवारो म्हणाले की, ‘भारतीय लोकांनी कृपया येथे काय चाललंय ते समजून घ्यावं. तुमच्याकडे ब्राह्मण, भारतीय लोकांच्या खर्चावर नफा कमवत आहेत. आपल्याला हे थांबवावं लागेल.’ नवारो यांच्या विधानची आता सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने त्या शब्दाचा अर्थ काढत आहे.

भारतीय अर्थतज्ज्ञ आणि पंतप्रधान आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजीव सान्याल यांनी नवारोच्या वक्तव्यावर टीका केली आहे. संजीव सान्याल म्हणाले की, ‘त्यांच्या वक्तव्यावरून अमेरिकेच्या धोरणात्मक/बौद्धिक क्षेत्रात भारत आणि हिंदूंबद्दलच्या विचारसरणीवर कोण नियंत्रण ठेवते याबद्दल बरेच काही सांगता येते. हे थेट 19 व्या शतकातील वसाहतवादी टीकांवरून घेतले आहे, जे जेम्स मिल सारख्या लोकांकडे परत जातात. एडवर्ड सैद यांचा प्राच्यवादावरील युक्तिवाद कदाचित मध्य पूर्वेवरील त्यांच्या मूळ सिद्धांतापेक्षा भारतासाठी अधिक योग्य आहे.’

नवारोच्या वक्तव्यावर भारतातील विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी नवारोच्या ब्राह्मण या वक्तव्यावर टीका केली. तसेच हे आरोप निराधार असल्याची टीका केली. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, ‘अमेरिकेने अशी निराधार वक्तव्य करू नये.’

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष म्हणाल्या की, ‘बोस्टन ब्राह्मण हा शब्द एकेकाळी अमेरिकेत न्यू इंग्लंडमधील श्रीमंत वर्गासाठी वापरला जात होता. इंग्रजी भाषिक जगात अजूनही सामाजिक आणि आर्थिक उच्चभ्रू दर्शवण्यासाठी ब्राह्मण हा शब्द वापरतात.’ तर भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी सागरिका घोष यांना प्रत्युत्तर देत लिहिलं की, नक्षलवाद हा शब्द ‘बोस्टन ब्राह्मण’ ऑलिव्हर वेंडेल होम्स सीनियर यांनी त्यांच्या 1861 च्या कादंबरी ‘एल्सी वेनर’ मध्ये वापरला होता, ज्यामध्ये त्यांनी या प्रभावशाली कुटुंबांची तुलना भारतातील सर्वोच्च पुरोहित जातीशी केली आहे. ते त्यांच्या बुद्धिमत्तेसाठी, परोपकारासाठी, नागरी कर्तव्यासाठी आणि विशिष्टतेसाठी, त्यांच्या शक्तीसाठी ओळखले जातात.

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनीही नवारो यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. प्रियंका म्हणाल्या की, पीटर नवारो यांनी भारतातील एका विशिष्ट जातीच्या ओळखीचा उल्लेख करून आपला मुद्दा मांडला आहे, जरी त्याचा अर्थ इतरांच्या तुलनेत ‘विशेषाधिकारप्राप्त वर्ग’ असला तरी, तो लज्जास्पद आणि भयावह आहे. अमेरिकन संदर्भात ब्राह्मण शब्दाच्या वापरावर मला व्याख्यान देण्यापासून कृपया दूर राहा.