भारतीय अर्थव्यवस्था…! टॅरिफ वॉर दरम्यान अमेरिकेने डॉलरच्या तुलनेत रुपयाची उडवली खिल्ली
अमेरिकेने भारतीय वस्तूंवर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे भारतीय वस्तू अमेरिकेत प्रचंड महागणार आहेत. त्यामुळे मागणीत घट होईल आणि निर्यातीवर परिणाम होणार आहे. त्याचे परिणाम आता दिसू लागले आहेत. असं असताना अमेरिकेने भारतीय रुपयाची खिल्ली उडवली.

भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आता कमालीचे ताणले गेले आहे. व्यापार युद्धात दोन्ही देश एकही पाऊल मागे सरकण्यास तयार नाहीत. अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला असूनही भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरुच ठेवली आहे. त्यामुळे अमेरिकेच्या तळपायाची आग मस्तकात गेली आहे. त्यामुळे आता अमेरिकेने भारताला डिवचण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांनी भारतीय रुपयाची खिल्ली उडवली आहे. इतकंच काय तर भारताचा रुपया कधीच अमेरिकन डॉलरची तुलना करू शकत नाही, असं देखील सांगितलं आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया निच्चांकावर आहे, त्यामुळे बरोबरी साधू शकत नाही असा चिमटाही काढला. अमेरिकेने सुमारे 70 इतर देशांवर नवीन टॅरिफ लादले आहेत.
फॉक्स न्यूज अँकरने अमेरिकेच्या ट्रेझरी सेक्रेटरी स्कॉट बेसंट यांना विचारले की, “तुम्हाला काळजी आहे का की भारत डॉलरमध्ये नाही तर रुपयात व्यापार करेल?” बेसेंट यांनी उत्तर दिले, “मला अनेक गोष्टींची चिंता आहे. रुपया राखीव चलन बनणे हे शक्य नाही.” भारतीय चलन सध्या सर्वात निच्चांकी पातळीवर आहे. त्या तुलनेत जागतिक व्यापारात डॉलरचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. शुक्रवारी, जागतिक चलनाची स्थिती पाहता अमेरिकेच्या एका डॉलरची किंमत भारतात 87.965 रुपये आहे.
रशियाकडून तेल आयात करणं सुरुच ठेवल्याने भारत अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत, असं बेसंट यांनी सांगितलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील संबंध पाहता भविष्यातील सहकार्याबद्दल आशावादी राहू, असं देखील त्यांनी पुढे सांगितलं. दुसरीकडे अमेरिकेतील तज्ज्ञांचं मत काही वेगळं आहे.
अमेरिकन अर्थतज्ज्ञ रिचर्ड वोल्फ यांच्या मते, अमेरिका भारताविरुद्ध आडमुठेपणाने वागत आहे. या धोरणामुळे अमेरिका स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेत आहे. ब्रिक्स देश आता पर्याय शोधत आहेत. दुसरीकडे, भारताच्या निर्यातीवर परिणाम दिसून येत आहे. अमेरिकेने भारताला त्यांच्या बाजारपेठेतून वगळले तर भारत ब्रिक्स गटाकडे अधिक झुकेल आणि हे पाऊल शेवटी पाश्चात्य देशांसाठी एक आव्हान बनेल, असा इशारा वोल्फ यांनी दिला.
