ट्रम्प यांचा बलाढ्य देशाच्या प्रमुखाला फोन, 30 मिनिटं चर्चा, इराणवर पुन्हा युद्धाचं सावट ?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात रविवारी फोनवर सुमारे 30 मिनिटं चर्चा झाली. त्यांच्यात झालेल्या संबाषणानंतर इराणमघध्ये पुन्हा युद्धाचा भडका उडणार की काय अशी भीती व्यक्त होत आहे.

ट्रम्प यांचा बलाढ्य देशाच्या प्रमुखाला फोन, 30 मिनिटं चर्चा, इराणवर पुन्हा युद्धाचं सावट ?
डोनाल्ड ट्रम्प
Image Credit source: Getty Images
| Updated on: May 18, 2026 | 8:59 AM

फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीसपासून अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या भीषण संघर्षामुळे संपूर्ण जगाचं धाबं दणाणलं. या युद्धाचा फटका फक्त या 2-3 देशांनाच नव्हे तर जगातील अनेक देशांना बसल्याचं दिसून आलं. होर्मुजची सामुद्रधुनी बंद, त्यामुळे निर्माण झालेलं उर्जा संकट, आयात-निर्यातीवर झालेला परिणाम, या सगळ्याचे चटके अनेक देशांना सहन करावे लागलेत. गेल्या काही काळापासून या संघर्ष थांबला असून शस्त्रसंधी लागू आहे, मात्र असं असंल तरी तणाव काही अद्याप पूर्णपणे कमी झालेला नाही.

याच दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यात रविवारी सुमारे 30 मिनिटं फोनवर संवाद झाला. या संभाषणानंतर लगेचच नेतान्याहू यांनी अत्यंत कडक बंदोबस्तातील मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजेरी लावली, तर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसच्या पत्रकारांना साऊथ लॉनवरील एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले.

युद्धापासून वाचण्याचा इराणचा प्रयत्न

अमेरिकेच्या गुप्तचर अधिकाऱ्यांनी फॉक्स न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, संभाव्य लष्करी कारवाईच्या शक्यतेमुळे तेहरानची चिंता वाढली आहे. आणि ती (कारवाई, संघर्ष) टाळण्यासाठी विलंब लावण्याचे डावपेच आखले जात आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी रविवारी संध्याकाळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा केली, ज्यामुळे या आठवड्यात इराणसोबत नवीन युद्ध सुरू होणार की काय, अशा आशयाच्या बातम्या पसरताना दिसत आहेत. ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील हे संभाषण अर्धा तास चाललं आणि इस्रायलच्या सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक सुरू होण्याच्या थोड्याच वेळ आधी त्यांचा संवाद संपला, अशी माहिती समोर आली आहे.

ट्रम्प -नेत्यानाहू यांच्यात काय बोलणं झालं ?

अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी इराणबद्दल चर्चा केली. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनी नेतान्याहू यांना त्यांच्या चीन दौऱ्याबद्दल माहिती दिली. एका इस्रायली अधिकाऱ्याने Ynet सांगितल्यानुसार, इराणवर हल्ला करण्याचा मुद्दा अद्याप अनिर्णित आहे आणि त्याबाबत राष्ट्राध्यक्षांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. “त्यांना त्या निर्णयावर स्वतःचे समाधान करून घ्यावे लागेल आणि जर त्यांनी पुन्हा संघर्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला, तर इस्रायललाही त्यात सहभागी होण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

फॉक्स न्यूजच्या मते, इराणच्या धोरणाबद्दल ट्रम्प यांची निराशा आणि तेहरानची अण्वस्त्रे बनवण्याची महत्त्वाकांक्षा यामुळे इराणसोबत पुन्हा संघर्ष सुरू होऊ शकतो. मध्यपूर्वेत कार्यरत असलेल्या गुप्तचर अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, डोनाल्ड ट्रम्प पुन्हा लष्करी कारवाईचा अवलंब करू शकतात, असं इराणला वाटत आहे. त्यामुळे संभाव्य लष्करी कारवाईत अडथळा आणण्यासाठी तेहरानकडून हेतुपुरस्सर विलंब लावण्याचे डावपेच वापरले जात आहेत.

Follow Us