पाकिस्तानात खरंच तेलाच्या विहिरी आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यात किती तथ्य? जाणून घ्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रशियाची असलेली जवळीक पाहता 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्यात भारताचा शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला मदतीचा हात देण्यास तयारी केली आहे.

पाकिस्तानात खरंच तेलाच्या विहिरी आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यात किती तथ्य? जाणून घ्या
पाकिस्तानात खरंच तेलाच्या विहिरी आहेत का? डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यात किती तथ्य? जाणून घ्या
| Updated on: Aug 08, 2025 | 4:58 PM

पाकिस्तानकडून सतत दहशतवादाला खतपाणी घातलं जात आहे. त्यामुळे भारताने पाकिस्तानसोबतची सर्व दारं बंद केली आहे. पण दुसरीकडे, अमेरिकेला मात्र पाकिस्तानवर खूपच प्रेम उतू जात आहे. आता तर म्हणे पाकिस्तानात तेलाच्या विहिरी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला गोंजारण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानातील तेल विहिरींबाबत एक करार करण्याची माहिती दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानातील तेल विहिरींचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. तेलसाठ्याबाबत पाकिस्तान जगातील 52वा क्रमांकाचा देश आहे. त्या तुलनेने भारतात पाकिस्तानपेक्षा दहापट जास्त तेलसाठे आहेत. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानशी करार करून तेल साठे विकसित करण्यासाठी काम करणार असल्याचं सांगितलं.”सध्या आम्ही या भागीदारीचे नेतृत्व करणारी तेल कंपनी निवडण्याच्या प्रक्रियेत आहोत. कोणाला माहित आहे, कदाचित ते कधीतरी भारताला तेल विकतील!”, असं ट्रम्प यांनी सांगितलं.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे दिवा स्वप्न आहे. कारण पाकिस्तान तेलाची गरज भागवण्यासाठी 85 टक्के आयात करतो. देशातील तेलाचं उत्पादन 10 ते 15 टक्केच आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी फक्त भारताला डिवचण्यासाठी असं वक्तव्य केल्याचं दिसत आहे. पाकिस्तान पेट्रोलियम इन्फॉर्मेशन सर्व्हिसेसच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यात देशातील तेल उत्पादनात 11 टक्क्यांनी घट झाली. पाकिस्तानकडे 9 अब्ज बॅरलपर्यंत पेट्रोलियम साठा असू शकतो. पण त्याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. सीआएच्या अंदाजानुसार, पाकिस्तानकडे, 332 दशलक्ष बॅरल तेलसाठा आहे. पण हा जगाच्या तुलनेत फक्त 0.021 टक्के ठआहे.

पाकिस्तानी मीडियात अनेकदा तेल साठ्यांबाबत दावे करण्यात आले आहे. पण त्यात काहीच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे. असाच समुद्री क्षेत्रात तेल आणि वायू साठा सापडल्याची चर्चा झाली होती. पण प्रत्यक्षात 5500 मीटर खोदल्यानंतर हाती काहीच लागलं नाही. इतकंच काय माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी कराची किनाऱ्याजवळ तेलसाठे सापल्याचा दावा केला होता. मात्र त्यातही काही तथ्य आढळलं नाही. पाकिस्तानच्या सिंधु खोऱ्यात भूकंपीय सर्व्हेक्षणानंतर ट्रम्प यांनी हा दावा केला आहे.पण त्यात हायड्रोकार्बन असू शकतं. त्यामुळे ट्रम्प हे फक्त हवेत बाता मारत असल्याचं दिसत आहे. भारत रशियाकडून तेल आयात करत असल्याने हा डाव टाकला आहे. ट्रम्प पाकिस्तानला एक प्यादं म्हणून वापरण्याचा प्रयत्न असू शकतो. तसेच पाकिस्तान संभाव्य तेल निर्यातदार म्हणून जगासमोर छबी निर्माण करू शकतो.