
अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक (DNI) तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेतील AMFest (अमेरिका फेस्ट) कार्यक्रमादरम्यान इस्लामच्या विचारसरणीबद्दल अत्यंत कठोर विधान केलं. त्यांनी इस्लामला अमेरिकेच्या स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक मोठा धोका असल्याचं म्हटलंय. इस्लामी विचारसरणीवरच त्यांनी जोरदार टीका केली आहे. इस्लामवाद, ज्याची व्याख्या त्यांनी धर्माऐवजी राजकीय विचारसरणी म्हणून केली, तो वैयक्तिक स्वातंत्र्य आणि खासगीपणाला नाकारत असल्याचा युक्तीवाद त्यांनी केला. इतकंच नव्हे तर अमेरिकेतील वैयक्तिक स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांना इस्लामिक विचारसरणीचा धोका असल्याचा इशारासुद्धा गबार्ड यांनी यावेळी दिला.
“ही इस्लामिक विचारसरणी आपल्या स्वातंत्र्यासाठी थेट धोका आहे. हा एक राजकीय अजेंडा आहे, ज्याचा उद्देश जागतिक खलिफा आणि शरिया आधारित शासन स्थापित करणं आहे. हा धोका आता केवळ परकीय देशांपुरता मर्यादित नाही, तर अमेरिकेतही रुजला आहे. या इस्लामी विचारसरणीमुळे निर्माणे होणारे धोके अनेक स्वरुपात येतात. नाताळ जवळ येत असताना या धोक्यामुळे जर्मनीमध्ये ख्रिसमस मार्केट रद्द केले जात आहेत. जेव्हा आपण इस्लामवादाच्या धोक्याबद्दल बोलतो, जी एक राजकीय विचारसरणी आहे. त्यात वैयक्तिक स्वातंत्र्यासारखी कोणतीच गोष्ट नसते”, असं परखड वक्तव्य त्यांनी केलंय.
तुलसी गबार्ड यांनी पुढे इशारा दिला की जर अमेरिकेनं ही विचारसरणी ओळखली नाही आणि त्याविरुद्ध वेळीच कारवाई केली नाही, तर देशात युरोप आणि ऑस्ट्रेलियासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेक अमेरिकन शहरांमध्ये कट्टरपंथी इस्लामिक धर्मगुरू उघडपणे तरुणांना दहशतवादाकडे ढकलत आहेत, भडकावत आहेत, असा धक्कादायक दावाही त्यांनी केला आहे.
गबार्ड यांनी यावेळी काही परिसरांचा उल्लेखसुद्धा केला. डिअरबॉर्न (मिशिगन), मिनियापोलीस (मिनेसोटा), पॅटरसन (न्यू जर्सी) आणि ह्युस्टन (टेक्सास) यांसारख्या भागात इस्लामिक धर्मगुरू उघडपणे या विचारसरणीचा प्रचार करत आहेत आणि तरुणांची भरती करत आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. याविषयी त्या पुढे म्हणाल्या, “न्यूजर्सीमधील पॅटरनस हे पहिलं मुस्लीम शहर असल्याचा अभिमान बाळगतं. तिथे कायदे किंवा हिंसाचाराद्वारे लोकांवर ही इस्लामिक तत्त्वे लादली जात आहेत.” तुलसी गबॉर्ड यांनी आधीही स्पष्ट केलं होतं की त्यांची टीका ही राजकीय इस्लाम आणि दहशतवादाविरुद्ध आहे. धर्म म्हणून इस्लाम किंवा व्यक्ती म्हणून मुस्लिमांवर माझी ही टीका नाही, असं त्यांनी म्हटलं होतं.