Turkey Earthquake : 30 हजार लोकांच्या मृत्यूनंतर सरकारला आली जाग, इतके बिल्डर्स थेट तुरुंगात

तुर्किस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या जीवितहानीनंतर आता सरकारने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना अटक करण्यात आली आहे.

Turkey Earthquake : 30 हजार लोकांच्या मृत्यूनंतर सरकारला आली जाग, इतके बिल्डर्स थेट तुरुंगात
| Updated on: Feb 13, 2023 | 3:24 PM

Turkey Syria Earthquake : तुर्कस्तान आणि सीरिया या २ देशामध्ये भूकंपाने आतापर्यंत हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. येथे अजूनही भूकंपाचे धक्के सुरूच आहेत. 6 फेब्रुवारी रोजी 7.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे आतापर्यंत 34000 लोकांचा मृत्यू झाला आहे. तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 12 हजारांहून अधिक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे आता तुर्की सरकारने कारवाई सुरु केली आहे. निकृष्ट इमारती बनवणाऱ्या बिल्डरांवर सरकारने कारवाई सुरू केलीये. ज्यामध्ये आतापर्यंत 131 जणांना अटक करण्यात आली आहे.

तुर्कस्तानमध्ये आलेल्या भूकंपामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अजूनही ढिगाऱ्याखालून लोकांना काढण्याचं काम सुरु आहे. अतिशय थंडीत देखील 24 तास ढिगाऱ्या खाली माणसांचा शोध सुरु आहे. भूकंपाच्या धक्क्यामुळे अनेक इमारती या पत्त्यासारख्या कोसळल्या. ज्यामुळे संपत्तीचे नुकसान तर झालेच पण जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे इमारतींच्या बांधकामाचा दर्जा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यामुळे सरकारने इमारतींचे कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिकांवर कारवाई सुरु केलीये. आतापर्यंत 131 बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले.

तुर्कस्तानमध्ये हजारो इमारती कोसळल्याने 29,605 लोकांचा मृत्यू झाला आहे. जखमी लोकांची संख्या देखील मोठी आहे. भूकंपामुळे निकृष्ट बांधकाम लवकर कोसळल्याचे तज्ज्ञांनी म्हटलं आहे. सरकारने योग्य वेळी पावले उचलली असती तर नुकसान टाळता आले असते. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

तुर्कस्थानमध्ये इमारतींना भूकंप प्रतिरोधक बनवणे बंधनकारक आहे. मात्र तुर्कस्तानमध्ये लाखो इमारती नियम धाब्यावर बसवून निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आल्या आहेत. तुर्कस्तानच्या कायदामंत्र्यांनी या निकृष्ट बांधकामाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तुर्कस्तानमधील तज्ञांनी आधीच इशारा दिला होता. पण भ्रष्टाचार आणि सरकारी धोरणांमुळे अशा कामांचा अभय मिळालं.

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये पहाटेच्या वेळी हा भूकंप झाला. ज्यावेळी अनेक जण झोपेत होते. मृतांचा आकडा 34000 वर गेला आहे. तुर्कस्थानमध्ये 29,605 लोकांनी तर सीरियामध्ये 4,574 जणांनी आपला जीव गमवला आहे.

जगभरात अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.