US-Iran : भारताचा नवा विश्वासू मित्र इराण समोर झुकला, हल्ले करु नये म्हणून विमानाने तेहरानला पाठवले 3 अब्ज डॉलर

US-Iran : अमेरिकेने इराणला टार्गेट केलं की, इराणकडून आखाती देशांना टार्गेट केलं जातं. हे फेब्रुवारी महिन्यापासून सुरु आहे. आता भारताच्या नव्या विश्वासू मित्राने त्यांच्यावर हल्ले करु नयेत म्हणून इराणसोबत डील केली आहे.

US-Iran : भारताचा नवा विश्वासू मित्र इराण समोर झुकला, हल्ले करु नये म्हणून विमानाने तेहरानला पाठवले 3 अब्ज डॉलर
US-Iran
| Updated on: Jun 10, 2026 | 1:32 PM

मध्य पूर्वेत युद्धाची स्थिती कायम आहे. फक्त मार्च-एप्रिलसारखं सतत हल्ले सुरु नाहीयत. थांबून, थांबून ब्रेक घेऊन हल्ले सुरु आहेत. अमेरिकेने इराणच्या तळांवर बॉम्ब हल्ले केल्यानंतर इराण आखाती देशांवर हल्ले करतो. महत्वाचं म्हणजे एकही आखाती देश इराणला उत्तर देण्याची धमक दाखवत नाही. त्यामुळे अमेरिकेने इराणला टार्गेट केलं की, इराणकडून सौदी अरेबिया, कुवेत, कतर, बहरीन, यूएई या देशांना टार्गेट केलं जातं. हे फेब्रुवारी महिन्यापासून सुरु आहे. म्हणून काही आखाती देशांनी इराण सोबत पैशांची डील केल्याच्या बातम्या आल्या. यात पहिलं नाव कतरचं आलं. इराणने हल्ले करु नये म्हणून कतरने त्यांच्यासोबत पडद्याआडून डील केली. आता संयुक्त अरब अमीरातने इराणसोबत डील केल्याची बातमी आहे. इस्रायली मीडियाने हे वृत्त दिलं आहे.

या डील नुसार UAE ने तेहरानला 3 अब्ज डॉलर पाठवले आहेत. त्या बदल्यात युद्ध काळात इराण संयुक्त अरब अमीरातवर हल्ला करणार नाही. इराणने मात्र अशी कुठली डील झाल्याचा इन्कार केला आहे. तेहरानला डील अंतर्गत कुठलेही पैसे मिळालेले नाहीत, असं इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटलं आहे. इस्रायली मिडिया कानच्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी विमानाने यूएईने तेहरानला 3 अब्ज डॉलर पाठवले. पैशांशिवाय यात आणखी काही सामान होतं का? या बद्दल कुठलाही खुलासा झालेला नाही.

2 हजारपेक्षा जास्त हल्ले

यूएई सरकारच्या माहितीनुसार, इराणने युद्ध काळात त्यांच्यावर 2 हजारपेक्षा जास्त हल्ले केले. इराणने यूएईवर 2265 ड्रोन हल्ले केले. 551 बॅलेस्टिक मिसाइल्स डागली. अबू धाबी आणि दुबईवर 29 क्रूज मिसाइल्सनी हल्ले केले. इराणच्या या हल्ल्यांमध्ये यूएईत 13 जणांचा मृत्यू झाला. 230 जण जखमी झाले. यूएई इस्रायलसोबत आहे, म्हणून त्यांच्यावर इतके सारे हल्ले केले, असं इराणचं म्हणणं होतं. युद्धाच्या दुसऱ्या लाटेत इराणने यूएईवर एकही हल्ला केलेला नाही. इराण सध्या फक्त कुवैत, बहरीन आणि जॉर्डन येथील अमेरिकी तळांना टार्गेट करतोय.

गोठवलेली 6 अब्ज डॉलरची संपत्ती

अमेरिकेसोबत युद्ध सुरु झाल्यानंतर इराणने कतरसोबत सुद्धा डील केली होती. कतरच्या कुठल्याही ठिकाणांवर इराण हल्ला करणार नाही. त्या बदल्यात कतर इराणची गोठवलेली 6 अब्ज डॉलरची संपत्ती त्यांना परत करायला तयार होता. कतर इराण आणि अमेरिकेत डील घडवण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे.

Follow Us