
जागतिक पातळीवर भारताचा दबदबा वाढत आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहे. अमेरिकेत यूएस इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये भारताचे कौतूक करण्यात आले. यावेळी अमेरिकेतील खासदार आणि इंडिया कॉकसचे सह-अध्यक्ष रिच मॅककॉर्मिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भरभरुन कौतूक केले.
अमेरिकेतील राजकीय तज्ज्ञही आता येणारा काळ भारताचा असल्याचे मान्य करु लागले आहे. यामुळे यूएस इंडिया स्ट्रेटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये अमेरिकन प्रतिनिधींकडून भारतावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनक यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते असे आहेत की त्यांना संपूर्ण देशाचा पाठिंबा मिळाला आहे.
रिच मॅककॉर्मिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक करताना म्हटले की, नरेंद्र मोदी हे भारतातील सर्वात प्रभावशाली नेते आहेत. कदाचित महात्मा गांधी यांच्यानंतर ते दुसरे सर्वात महान नेते आहेत. ते विनयशील आहेत. जनता त्यांना पंतप्रधान होण्यापूर्वीही ओळखत होती. ते खरे जननेता आहेत. ते आक्रमक राष्ट्रवादाचे प्रतिक आहेत. जागतिक दृष्टीकोन चांगल्या पद्धतीने समजून त्यांनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे.
वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करताना म्हटले की, अमेरिकेत संपूर्ण देशातून निवडलेला व्यक्ती सर्वोच्च पदावर आहे. भारतात नरेंद्र मोदी यांचीही परिस्थिती अशीच आहे. दोन्ही नेत्यांमध्ये चांगले संबंध आहे. त्यामुळे दोन्ही देशातील व्यापार वाढत आहे. काही करार होण्यास वेळ लागतो, परंतु प्रयत्न सुरु ठेवले पाहिजे.
अमेरिकेतील खासदार स्टीव्ह डेन्स यांनी भारताची तुलना चीनसोबत केली. ते म्हणाले, जागतिक पातळीवर गुंतवणूक आता चीनऐवजी भारताकडे वाढत आहे. भारतातील माझा प्रवास मला २० वर्षांपूर्वीचा चीनची आठवण करु देतो. भारतात खूप शक्यता आहेत आणि नवीन गोष्टी उदयास येत आहेत. मी जेव्हा चीनला जातो तेव्हा माझा फोन वॉशिंग्टनमध्ये सोडतो, पण जेव्हा भारतात येतो तेव्हा माझा फोन सोबत घेऊन येतो आणि व्हिडिओ कॉलद्वारे कुटुंबालाही दाखवतो.