
अमेरिका आणि भारतात टॅरिफच्या मुद्दावरून तणाव आहे. भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ हा अमेरिकेकडून लावण्यात आला आहे. जर भारताने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या तर त्याचा थेट परिणाम हा भारतीय अर्थव्यवस्थेवर होईल. अमेरिका या टॅरिफच्या अटी भारताने मान्य कराव्यात, यासाठी वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकत आहे. मात्र, भारताकडून स्पष्ट करण्यात आले की, काहीही झाले तरीही आम्ही झुकणार नाहीत. हेच नाही तर अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला मोठी धमकी दिली. भारताने या धमकीला देखील भीक घातली नाही. सातत्याने भारताबद्दल वादग्रस्त विधान करताना डोनाल्ड ट्रम्प हे दिसत आहेत.
कालच डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांच्यात तब्बल 3 तास बंद दाराआड बैठक झाली. या बैठकीचा मुख्य अजेंडा हा युक्रेन युद्धाचा होता. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदललेल्या भाषेवरून हे स्पष्ट होतंय की, या बैठकीत भारतावर लादलेल्या टॅरिफबद्दल देखील चर्चा झाली. भारताच्या विरोधात मागील काही दिवसांपासून आग ओकणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतिनच्या भेटीनंतर पूर्ण भाषाच बदलून गेली आहे.
पुतिन यांच्या भेटीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी बोलताना म्हटले की, सध्याच याची गरज नाही. रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर अतिरिक्त टॅरिफ लावण्याबद्दल पुढीत दोन ते तीन आठवडे विचार केला जाईल. त्यांनी पुढे म्हटले की, आज जे झाले त्यानंतर मला टॅरिफबद्दल विचार करावा लागत नाहीये. दोन ते तीन आठवड्यांनंतर कदाचित मी यावर विचार करेल. पण आता नाहीच, बैठक खूप चांगली आहे.
पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीनंतर ट्रम्प यांची टॅरिफबद्दल बोलण्याची भाषा पूर्णपणे बदलली आहे. टॅरिफवरून ते सातत्याने भारताला धमक्या देत होते. आता सध्या टॅरिफची गरज नसल्याचे त्यांनी थेट म्हटले आहे. म्हणजेच थोडक्यात काय तर सध्या टॅरिफची गरज नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सांगण्यात आलंय. अमेरिकेच्या टॅरिफविरोधात अनेक देशांनी मोर्चा सुरू केला होता. भारतासह अनेक देशांना दिलासा मिळाल्याचे बघायला मिळतंय.