
भारत आणि अमेरिका यांच्या टॅरिफ वॉर भडकले आहे. दोन्ही देशातील वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. 25 टक्के टॅरिफवरून ट्रम्प यांनी ते 50 टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. भारत या धमकीला भीक घालत नसल्याचे दिसताच ट्रम्प यांचा तीळपापड झाला आहे. भारताला डिवचण्यासाठी आता ट्रम्प यांनी नवीन खेळी खेळली आहे. पाकिस्तानसोबतचा दोस्ताना वाढवण्याची खेळी ट्रम्प यांनी खेळली आहे. पाकच वृत्तपत्र डॉनने एक वृत्त दिले आहे, त्यानुसार, लष्कर प्रमुख असीम मुनीर हा याच महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहे. ऑगस्टच्या अखेरीस मुनीर वॉशिंग्टनमध्ये असतील.
यह रिश्ता क्या कहलाता है
ऑपरेशन सिंदूरमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर आसीम मुनीर याने अमेरिका दौरा केला होता. त्याला ट्रम्प यांनी आमंत्रण दिल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर भारतासोबत टॅरिफ वॉर सुरु असतानाच अमेरिकेने पाकिस्तानला हाताशी धरले आहे. अमेरिकेच्या लष्कराचे जनरल आणि युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडचे कमांडर मायकल कुरिला यांच्या निरोप समारंभासाठी मुनीर उपस्थित असतील. कुरिला हे मुनीर यांचे मित्र मानण्यात येतात. पाकिस्तान दहशतवादाविरोधात लढा देत असल्याचा दावा कुरिला यांनी केला होता.
कुरिला मुनीरचे मुरीद का?
अमेरिकेच्या लष्कराचे जनरल कुरिला हे मध्य-पूर्वेत अनेक दिवस कार्यरत होते. आयएसआयएस आणि इतर दहशतवादी संघटनांचा बिमोड करण्यासाठी ते सक्रीय होते. ते या महिन्यात निवृत्त होत आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने पाच आयएसआयएस दहशतवाद्यांना अटक केली होती. त्याचे कौतुक कुरिला यांना आहे. अमेरिकेने त्यासाठी इनपूट पुरवले होते. त्यानंतर पाकिस्तानी पोलीस आणि लष्कराने संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांना पकडले होते.
भारत-पाक संघर्ष थांबवण्याचे क्रेडिट ट्रम्प यांना
भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष पेटला होता. 10 मे रोजी दोन्ही देशांनी अधिकृतपणे युद्धविरामाची घोषणा केली होती. त्याचे श्रेय अर्थातच दुपारी ट्रम्प यांनी घेतले होते. पण भारत आणि पाकिस्तानमधील अनेक नेत्यांनी ट्रम्प यांच्यामुळे युद्ध विराम झाल्याचे नाकारले होते. संघर्ष थांबताच मुनीर यावर्षी जून महिन्यात अमेरिकेत गेले. त्यांनी ट्रम्प यांच्यासोबत जेवण केले. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. व्हाईट हाऊसनुसार, ट्रम्प यांनी मुनीर यांना आमंत्रण धाडले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये अणुयुद्ध होण्याची भीती होती, ते आपण थांबवल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. अजूनही ते दोन्ही देशातील संघर्ष थांबवण्याचे क्रेडिट सारखे घेत आहेत. भारताने हे श्रेय न दिल्यानेच टॅरिफ लादल्याची चर्चा आता होत आहे.