ऑपरेशन सिंदूरवेळी चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकेने मानली भारताची ताकद

Operation sindoor china pakistan : भारताची ताकद चीनच्या भविष्यातील सत्तास्पर्धेवर परिणाम करू शकते, असे अमेरिकी आयोगाच्या अहवालात नमूद आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनने पाकिस्तानला नेमकी कशी मदत केली, याचाही अहवालात उल्लेख आहे.

ऑपरेशन सिंदूरवेळी चीन पाकिस्तानसोबत का उभा राहिला? अमेरिकेने मानली भारताची ताकद
operation sindoor china pakistan
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 11:17 PM

ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनने पाकिस्तानला मदत का केली, यामागचे महत्त्वाचे कारण आता अमेरिकी अहवालातून समोर आले आहे. भारताची वाढती लष्करी, आर्थिक आणि जागतिक ताकद चीनसाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. भारत हा चीनच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकणाऱ्या मोजक्या देशांपैकी एक असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भारताला रोखण्यासाठी चीन पाकिस्तानला बळ देत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

भारताची ताकद चीनसाठी आव्हान

US-China Economic and Security Review Commission ने 18 नोव्हेंबर रोजी 2026 Report to Congress प्रसिद्ध केला. या अहवालात भारताला जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश, सर्वात मोठी लोकशाही आणि अण्वस्त्रधारी देश म्हणून संबोधण्यात आले आहे. भारताकडे जगातील सर्वात मोठ्या सैन्यदलांपैकी एक सैन्यदल असून, चीनसोबतची 2,100 मैलांची वादग्रस्त सीमा आहे. भारताची ही ताकद चीनसोबतच्या भविष्यातील सत्तास्पर्धेवर परिणाम करू शकते, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Loading...

पाकिस्तानला मदत करून भारतावर दबाव

अहवालानुसार, चीन आणि पाकिस्तानमधील वाढती लष्करी भागीदारी भारतासाठी दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका वाढवणारी आहे. मे 2025 मध्ये ऑपरेशन सिंदूरदरम्यान चीनने थेट युद्धात उतरण्याऐवजी पाकिस्तानला मदत करण्याची रणनीती अवलंबली. पाकिस्तानला चिनी बनावटीची आधुनिक शस्त्रास्त्रे मिळाली होती. तसेच चिनी तज्ज्ञांनी पाकिस्तानमध्ये राहून तांत्रिक मदत केल्याचाही उल्लेख अहवालात आहे.

भारताला रोखण्यासाठी चीनचे प्रयत्न

भारताची ताकद लक्षात घेऊन चीन लष्करी, आर्थिक आणि सागरी क्षेत्रात दबाव निर्माण करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. भारताला आवश्यक असलेल्या काही औद्योगिक वस्तू, तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या पुरवठ्यावरही चीनने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे भारताचा वाढता प्रभाव रोखण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचे अमेरिकी आयोगाने नमूद केले आहे.

अहवालात 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षाचाही उल्लेख करण्यात आला आहे. या घटनेनंतर भारत आणि चीनमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला. 2024 पासून दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले असले, तरी चीनच्या पाकिस्तानसोबतच्या वाढत्या लष्करी सहकार्यामुळे भारताची चिंता कायम असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. विशेष म्हणजे, चीनने भारताला केवळ सीमेवरच नव्हे, तर आर्थिक आणि सामरिक पातळीवरही आव्हान देण्याचा प्रयत्न केल्याचे अमेरिकी आयोगाने अधोरेखित केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us