24 तास धोक्याची, अमेरिकेने इराणला ललकारले, जग मोठ्या संकटात, थेट..
QUAD Meeting Live : इराण आणि अमेरिका युद्ध एकदाचे थांबावे, ही जगाची इच्छा आहे. मात्र, परिस्थिती अधिक चिघळताना दिसत आहे. जवळपास गेल्या अडीच महिन्यापेक्षा अधिक काळापासून होर्मुज खाडी बंद आहे. मात्र, तरीही परिस्थिती काही नियंत्रणात येत नाही. त्यामध्ये मोठा इशारा इराणला देण्यात आला..

क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक आज दिल्लीत सुरू झाली. भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्व देशांच्या प्रतिनिधीचे स्वागत केले. जागतिक परिस्थितीवर यादरम्यान चर्चा आहे. होर्मुज खाडी हा महत्वाचा मुद्दा आहे. या बैठकीत अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो उपस्थित आहेत. यादरम्यान त्यांनी इराणला मोठा इशारा दिला. यासोबतच त्यांनी स्पष्ट केले की, होर्मुज खाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये खुली होईल. होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये जे काही घडत आहे ते बेकायदेशीर, अस्थिर आणि जगाला अस्वीकार्य आहे, असेही त्यांनी म्हटले. परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी भारतात दाखल होताच इराणसोबत लवकरच करार होईल आणि होर्मुज खाडी खुली होईल, असे म्हटले होते. मात्र, गेल्या 24 तासात ज्याकाही घडामोडी घडताना दिसत आहेत, त्यानुसार परिस्थिती नियंत्रणात येण्याऐवजी अधिक चिघळताना दिसत आहे.
मार्को रुबियो यांनी यादरम्यान भारताचे काैतुकही केले. त्यांनी म्हटले की, भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्टेलिया यासारखे देश मजबूत लोकशाही मूल्यांचे पालन करतात. स्थिर, सुरक्षित प्रदेश ठेवण्याकरिता कटिबद्ध आहेत. इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावात असताना मार्को रुबियो यांचा भारत दाैरा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या या दाैऱ्याकडे जगाच्या नजरा आहेत.
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाने जग वैतागले आहे. दोन दिवसांनी या युद्धाला तीन महिने पूर्ण होतील. अमेरिकेने ज्यावेळी इराणवर पहिला मोठा हल्ला केला, त्यावेळी त्यांना वाटले की, इराण फार जास्त उत्तर देणार नाही. कारण त्यांच्या सर्वाेच्च नेत्याचीच हत्या पहिल्या हल्ल्यात केली. जास्तीत जास्त चार आठवडे युद्ध राहिले, असा अंदाज होता.
आजही इराण हार मानताना दिसत नाही. अमेरिकेने इराणभोवती मोठी नाकेबंदी केली. मात्र, या नाकेबंदीनंतरही इराण माघार घेत नाही. इराण आजही काही गोष्टींवर ठाम आहे. पण होर्मुज खाडी बंद असल्याने अनेक देश संकटात आहे. स्थिती व्यवस्थित व्हायची तर अधिक चिघळताना दिसत आहे.