US-Iran War: ‘सगळं काही एका रात्रीत…’ इराणशी चर्चा सुरु करण्याआधी जेडी व्हान्स यांचं मोठं वक्तव्य

US-Iran War : गेल्या आठवड्यात पाकिस्तानमध्ये अमेरिका- इराण यांच्यातील चर्चा निष्फळ ठरली असली तरी आता या आठवड्याअखेरीस दोन्ही देश पुन्हा एकमेकांशी चर्चा करणार आहेत. मात्र त्याआधीच आमेरिकेकडून अत्यंत महत्वाचं विधान करण्यात आलंय.

US-Iran War:  सगळं काही एका रात्रीत... इराणशी चर्चा सुरु करण्याआधी जेडी व्हान्स यांचं मोठं वक्तव्य
डोनाल्ड ट्र्म्प आणि जेडी व्हान्स
Image Credit source: Drew Angerer/Getty Images
| Updated on: Apr 15, 2026 | 8:47 AM

40 दिवसांचा संघर्ष, मग युद्धविरामाची घोषणा, त्यानंतर इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराणमध्ये 21 तास झालेली चर्चा… पण त्यातूनही काही निष्पन्न झाल्याने जगावर पुन्हा युद्धाचं सावट घोंगावू लागलं की काय असं वाटू लागलं. मात्र आताअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दुसऱ्या टप्प्यातील चर्चेचे संकेत दिले. येत्या दोन दिवसांत अमेरिका व इराणच्या शिष्टमंडळातील अधिकारी पुढील चर्चेसाठी पुन्हा इस्लामाबादमध्ये भेटू शकतात, असं ट्रम्प म्हणाले होते. त्यामुळे या भेटीत दोन्ही देशांमध्ये अखेर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र इराणशी पुढील भेट आणि चर्चेच्या आधीच आता अमेरिकेकडून एक मोठं विधान आलं आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी मोठा व्यक्तव्य केलं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील अविश्वास एका रात्रीत दूर होऊ शकत नाही असं ते म्हणाले.

व्हान्स यांचं म्हणणं काय ?

मंगळवारी जेडी व्हान्स म्हणाले की, “वॉशिंग्टन (अमेरिका) आणि तेहरान (इराण) यांच्यात तीव्र अविश्वास कायम आहे, जो रातोरात ( अवघ्या एका रात्रीत) दूर होऊ शकत नाही.” “इराणकडून वाटाघाटींसाठी जे आले आहेत, त्यांना करार हवा आहे आणि सध्याच्या परिस्थितीवर आम्ही बरेच समाधानी आहोत असं त्यांना वाटतं” असंही ते पुढे म्हणाले. व्हान्स यांनी गेल्या आठवड्यात पाकिस्तानात झालेल्या चर्चेत भाग घेतला होता.

“इराण आणि अमेरिका यांच्यात निश्चितच, प्रचंड अविश्वास आहे. ही समस्या रातोरात सुटणार नाही,” असे जेडी व्हान्स ‘टर्निंग पॉइंट यूएसए’च्या एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले. त्यांनी पुढे सांगितलं, इराणी वाटाघाटीकारांना तडजोड करायची आहे आणि “मला वाटतं की आम्ही सध्याच्या परिस्थितीवर खूप समाधानी आहोत.” असं त्यांनी नमूद केलं. एकंदरच इराण व अमेरिकीतील तणाव सहजासहजी दूर होईल की नाही याबद्दल साशंकता आहे.

ट्रम्पकडून चर्चेचे संकेत

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच संकेत दिले की, पाकिस्तानात युद्ध संपवण्यासाठीची चर्चा पुढील दोन दिवसांत पुन्हा सुरू होऊ शकते. युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये झालेली शांतता चर्चा अयशस्वी झाल्यानंतर वॉशिंग्टनने गेल्या आठवड्यात इराणच्या बंदरांवर नाकेबंदी लादली होती. अमेरिका आणि इराण यांच्यातील दोन आठवड्यांची शस्त्रसंधी अजून एक आठवडा टिकणार आहे. 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरू झालं. या संघर्षात हजारो लोक मारले गेले असून लाखो लोक विस्थापित झाले आहेत.

UN महासचिवांनी व्यक्त केली मध्य पूर्वेतील संघर्षावर चिंता

दुसरीकडे संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी मध्य पूर्वेतील सद्यस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. या संकटावर कोणताही लष्करी तोडगा नाही आणि शांततेसाठी वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी सर्व पक्षांना, होर्मुझच्या सामुद्रधुनीसह, आंतरराष्ट्रीय नौकानयन हक्क आणि स्वातंत्र्याचा आदर करण्याचे आवाहन केले.

संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी ‘एक्स’ (पूर्वीच ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्ट केली होती. “मध्यपूर्वेतील संकटावर कोणताही लष्करी तोडगा नाही. गंभीर वाटाघाटी पुन्हा सुरू झाल्या पाहिजेत. युद्धविराम कायम ठेवला पाहिजे आणि गरज पडल्यास तो वाढवला पाहिजे. सर्व पक्षांनी आंतरराष्ट्रीय नौकानयन हक्क आणि स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे.” असं त्यांनी त्यात नमूद केलं होतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us