मोठी बातमी! 33 भारतीय पर्यटक असणारी बोट बुडाली, 15 जणांच्या मृत्यूची भीती; व्हिएतनाममध्ये खळबळ

Vietnam Boat Accident : व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात 15 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मोठी बातमी! 33 भारतीय पर्यटक असणारी बोट बुडाली, 15 जणांच्या मृत्यूची भीती; व्हिएतनाममध्ये खळबळ
Vietnam Boat Sink
Image Credit source: Google
| Updated on: Jul 11, 2026 | 3:35 PM

व्हिएतनाममधून मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी एक बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हनोई येथील भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनानुसार, फु क्वोक बेटाजवळ काही तासांपूर्वी भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली. या दुर्घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर शोध आणि बचावकार्य सुरू आहे. यात 15 जणांच्या मृत्यूची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय दूतावासाने या घटनेबाबत सांगितले की, या अपघाताचे नेमके कारण आणि बोटीत किती प्रवासी होते, याची अचूक माहिती गोळा करण्यात येत आहे. प्रभावित कुटुंबीयांना मदत करण्यासाठी हो ची मिन्ह सिटी येथील भारतीय वाणिज्य दूतावासात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मात्र स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार या बोटीत 33 भारतीय पर्यटक होते, यातील 15 जणांच्या मृत्यूची भीती वर्तवण्यात आलेली आहे.

भारतीय दूतावासाने काय म्हटले?

भारतीय दूतावासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या दुर्घटनेबाबत माहिती किंवा मदतीसाठी भारतीय वाणिज्य दूतावासाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. तसेच हनोई येथेही स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला असून, दुर्घटनेशी संबंधित मदत आणि चौकशीसाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रशासनाकडून मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत. पर्यटकांचे नातेवाईक +84 362817930, +84 915523714 , +84 334520414 , +84 913089165 (हनोई) या क्रमांकावर फोन करून चौकशी करू शकतात. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेबाबत अधिक माहितीची अद्याप समोर आली नसून स्थानिक प्रशासन आणि भारतीय दूतावास परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

बचाव मोहिमेसमोर कोणती आव्हाने?

अपघातानंतर परिसरातून जात असलेल्या पर्यटकांनी भरलेल्या इतर बोटी पलटलेली बोट पाहताच तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धावल्या. बचावकार्यात सहभागी असलेल्या एका बोटमालकाने सांगितले की, त्यांची बोट अवघ्या पाच मिनिटांत घटनास्थळी पोहोचली होती. मात्र, बचाव मोहिमेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला, कारण अनेक पर्यटक पलटलेल्या बोटीच्या आत अडकले होते. त्यामुळे केवळ काही जणांनाच जिवंत बाहेर काढणे शक्य झाले.

 

Follow Us