मलाही ‘कॉकरोच’ बनायचंय… विजय माल्याच्या ट्विटने खळबळ; मोठं कारण आलं समोर

भारतातून पळालेला उद्योगपती विजय माल्याने 'मलाही कॉकरोच बनायचंय' असे ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे. कॉकरोचचे आयुष्य चांगले असते आणि माझ्यावर अन्याय होत आहे, असंही त्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. नुकत्याच नीट आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या यशाचाही त्याने ट्विटमध्ये उल्लेख केला आहे.

मलाही कॉकरोच बनायचंय... विजय माल्याच्या ट्विटने खळबळ; मोठं कारण आलं समोर
Vijay Mallya
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 10:59 AM

भारतातून पलायन करून विदेशात लपलेला उद्योगपती विजय माल्याने कॉकरोच जनता पार्टीच्या संदर्भाने एक पोस्ट केली आहे. मलाही कॉकरोच बनायचं आहे, असं माल्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे कॉकरोच का बनायचं आहे? याचं कारणही माल्याने दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जगभरात सीजेपीची जोरदार चर्चा सुरू आहे. खासकरून जंतरमंतरवरील आंदोलन आणि त्या आंदोलनाला आलेलं यश यामुळे अनेकांना सीजेपीची भुरळ पडली आहे. तसेच अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाचीही चर्चा होत आहे. त्यातच आता विजय माल्याचं ट्विट आल्याने पुन्हा एकदा सीजेपी चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे.

विजय माल्याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. मी जेवढा अन्याय सहन केला आणि अजूनही सहन करत आहे, हे पाहून वाटतं मलाही कॉकरोच बनायला हवं. कॉकरोचचं आयुष्य कदाचित चांगलं असतं, असं माल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे. माल्याने त्याच्यासोबत अन्याय झाल्याचं म्हणत व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

 

ईडीवर माल्या काय म्हणाला?

माल्याने अजून एक दुसरी पोस्ट केली आहे. त्यात त्याने ईडीवर भाष्य केलं आहे. देशातील सर्वाधिक भयंकर एजन्सी ईडीने कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल करून मी 2021मध्ये बँकांना 14 हजार कोटी रुपये दिल्याचं मान्य केलं आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर माझं म्हणणं सोडून द्या. पण ईडीने काय म्हटलं होतं ते तर ऐका; असं माल्याने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, किंगफिशर एअरलाइन्सचा विजय माल्या, फायरस्टार इंटरनॅशनलचा नीरव मोदी आणि स्टर्लिंग बायोटेक तसेच स्टर्लिंग एसईझेडचा नितीन संदेसरा यांच्यासह 15 लोकांना फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. या 15 जणांवर गेल्या वर्षी 31 ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या बँकांचे 57 हजार कोटीहून अधिक रुपये बुडवल्याचा आरोप आहे.

या टॉप 15 गुन्हेगारांच्या लिस्टमध्ये इतर काही लोकांचाही समावेश आहे. यात जाइलॉग सिस्टिमचे सुदर्शन वेंकटरमन आणि रामानुजम शेषारथिनम, स्टर्लिंग बायोटेकचे नितीन संदेसरा, चेतन संदेसरा आणि पुष्पेश कुमार बैद आदींचा समावेश आहे.

कॉकरोचचं यश

दरम्यान, नीट परीक्षेतील घोटाळ्याविरोधात अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. त्यासाठी दीपके हे अमेरिकेतून भारतात आले होते. या आंदोलनात देशभरातील विद्यार्थी सहभागी झाले होते. अलिकडच्या काळातील देशातील विद्यार्थ्यांचं हे सर्वात मोठं आंदोलन होतं. तत्कालीन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली होती. सीजेपीच्या आक्रमक आंदोलनामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे कॉकरोच जनता पार्टीची संपूर्ण देशासह जगभरात चर्चा सुरू झाली होती

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us